हॉटेल व्यावसायिकांचा पुढाकार

By Admin | Published: May 15, 2016 12:32 AM2016-05-15T00:32:22+5:302016-05-15T00:32:22+5:30

हॉटेलांमध्ये टेबलावर भरलेले पाण्याचे जग ठेवण्यापेक्षा बाटल्या ठेवल्यास आवश्यक तेवढेच पाणी ग्राहक घेतील. साध्या नळांऐवजी पुश कॉक लावून पाणीबचत करता येईल.

Hotel Professional Initiative | हॉटेल व्यावसायिकांचा पुढाकार

हॉटेल व्यावसायिकांचा पुढाकार

googlenewsNext

पिंपरी : हॉटेलांमध्ये टेबलावर भरलेले पाण्याचे जग ठेवण्यापेक्षा बाटल्या ठेवल्यास आवश्यक तेवढेच पाणी ग्राहक घेतील. साध्या नळांऐवजी पुश कॉक लावून पाणीबचत करता येईल. मोठ्या हॉटेलांमध्ये वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक करून पाण्याच्या पुनर्वापरास प्राधान्य द्यावे. या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यास शहरातील हॉटेल व्यावसायिकांनी पुढाकार घेतला आहे. लोकमतच्या जलमित्र अभियान या स्तुत्य उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविण्याचा निर्धार हॉटेल असोसिएशनच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.
दुष्काळी परिस्थितीत काटकसरीने पाणी वापरणे महत्त्वाचे असून, पाणी बचतीचे महत्त्व पटवून देण्यासाठी ‘लोकमत’ने जलमित्र अभियान हाती घेतले आहे. या अभियानाचा भाग म्हणून लोकमत पिंपरी-चिंचवड कार्यालयात हॉटेल व्यावसायिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा घेण्यात आली.
या परिचर्चेत पिंपरी-चिंचवड हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष पद्मनाभ शेट्टी, कार्याध्यक्ष गोविंद पानसरे, सेक्रेटरी गणेश कुदळे, उपाध्यक्ष सुमित बाबर या पदाधिकाऱ्यांसह शंकर चक्रबर्ती, अब्दुल खान, वैभव चाबुकस्वार आदी उपस्थित होते.
या वेळी असोसिएशनचे कार्याध्यक्ष गोविंद पानसरे म्हणाले, गार्डन रेस्टॉरंटमध्ये महापालिकेचे पिण्याचे पाणी वापरण्याऐवजी बोरवेलचे पाणी वापरास प्राधान्य देता येईल. जेणेकरून पिण्याच्या पाण्याचा काटकसरीने वापर होईल. हॉटेल व्यावसायिकांच्या संघटनेचे सुमारे एक हजार सदस्य आहेत. त्यांना पाणी बचत अभियानाबद्दल सोशल मीडियावरून किंवा एसएमएसद्वारे पाठविण्याचे नियोजन आहे. संघटनेच्या वतीने हॉटेल व्यावसायिकांमध्ये पाणी बचतीबाबत जागृती करण्यात येईल. हॉटेलच्या प्रत्येक टेबलावर स्टॅन्डी ठेवता येतील. त्याद्वारे ग्राहकांना पाणीबचतीचा संदेश देता येऊ शकतो. दररोज हॉटेल बंद झाल्यानंतर ते धुण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर होतो. त्याऐवजी जर मॉपिंग केले, तर पाण्याची बचत होईल, असे सुमित बाबर यांनी सुचविले.
लोकमतचे हे अभियान स्तुत्य असून, वर्षभर हे अभियान राबविण्यास हरकत नाही. मनुष्यप्राण्यांबरोबर प्राणी व पक्ष्यांनाही पाण्याची गरज भासते, हे लक्षात घेऊन त्यांच्यासाठी पाणी तसेच खाद्य ठेवण्याची सोय करावी. उपाययोजना कराव्यात, असे अब्दुल खान यांनी सांगितले. आवश्यक तेवढेच पाणी उपलब्ध होईल, अशा पद्धतीने नळाच्या पाण्याचा प्रवाह ठेवण्याची व्यवस्था केली, तर गरजेपुरते पाणी वापरले जाईल, असे शंकर चक्रवर्ती यांनी नमूद केले.(प्रतिनिधी) हॉटेलमधील चमचा, ग्लास, ताटे हे धुण्यासाठी खूप पाणी लागते. पाण्याऐवजी कोरडे कापड वापरल्यास पाणीबचत करणे शक्य होईल. ग्लासमध्ये उरलेले पाणी जमा करून साफसफाईसाठी वापरले जाऊ शकते, अशी सूचना वैभव चाबुकस्वार यांनी केली. महापालिका शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करत आहे. हा पाणीपुरवठा चार तास केला जातो. त्यामुळे पाण्याचा साठा करण्याकडे कल वाढतो. दोन दिवसांनी पाणी आल्यावर आधीचे पाणी ओतून देतात व पुन्हा पाणी भरतात. यामुळे पाण्याची नासाडी होते. दिवसाआड चार तासऐवजी रोज एक तास पाणीपुरवठा करावी, असे अध्यक्ष पद्मनाथ शेट्टी यांनी सुचविले.
रोटरी क्लबच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातात. नळकोंडाळे दुरुस्ती, गळती असेल, तर नळ बदलणे, असे उपक्रम राबवले जातात. यापुढे लोकमतच्या जलमित्र अभियानासाठी पूरक असे काम करण्यासाठी पुढाकार घेणार आहे, अशी ग्वाही गणेश कुदळे यांनी दिली.

Web Title: Hotel Professional Initiative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.