घरखरेदी, गृहप्रवेशाने अनेकांनी उभारली गुढी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2016 01:44 AM2016-04-09T01:44:05+5:302016-04-09T01:44:05+5:30
शहर परिसरामध्ये गुढीपाडवा उत्साहात साजरा करण्यात आला. मंदीचे सावट असतानाही शहरात लाखो रुपयांची उलाढाल झाली.
पिंपरी : शहर परिसरामध्ये गुढीपाडवा उत्साहात साजरा करण्यात आला. मंदीचे सावट असतानाही शहरात लाखो रुपयांची उलाढाल झाली. नागरिकांनी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी केली. तसेच स्वत:च्या हक्काचे घरखरेदीलाही प्राधान्य दिले. काही जणांनी नव्या घरात प्रवेश केला.
पाडव्यानिमित्त शहरातील बाजारपेठेमध्ये उत्साह जाणवत होता. नागरिकांनी सकाळपासूनच खरेदीसाठी गर्दी केली होती. इलेक्ट्रॉनिक्स दुकानदारांनी पाडव्यानिमित्त खास आॅफर ठेवल्या होत्या. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दुकानाची सजावट केली होती. यंदा उन्हाळ्यामुळे नागरिक हैराण आहेत. त्यापासून सुटका करण्यासाठी एसी खरेदी करण्यास प्राधान्य दिले. टीव्हीच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी दिसत होती. हप्त्याने पैसे भरण्याची सुविधा काही कंपन्यांनी उपलब्ध करून दिली होती. त्याचाही फायदा ग्राहकांनी घेतला. राज्यभरात असलेले दुष्काळाचे सावट आणि जागतिक मंदीचा फारसा परिणाम बाजारपेठेवर झाला नसल्याचे जाणवत होते.
अनेक बांधकाम व्यावसायिकांंनी पाडव्यानिमित्त घर घेण्यासाठी आकर्षक सवलती जाहीर केल्या होत्या. तर यापूर्वी नोंदणी केलेल्या ग्राहकांना सदानिकांचा ताबा दिला. त्यामुळे ग्राहकांचा आनंद द्विगुणित झाला. दुचाकी आणि चारचाकी गाड्या खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी शो-रुमच्या बाहेर गर्दी केली होती. त्यांनी यापूर्वीच गाड्यांची नोंदणी केली होती. पण पाडव्याच्या दिवशी गाडी ताब्यात घेतली.
शहरातील मिठाई दुकानाच्या भोवतीही गर्दी दिसत होती. मिठाई दुकानदारांनी पाडव्यानिमित्त खास मिठाईचे बॉक्स बनविले होते. या वेळी अनेक जणांनी मिठाई देऊन एकमेकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. यानिमित्त मिठाई दुकानदारांनी सवलतीच्या दरामध्ये मिठाई विक्रीसाठी ठेवली होती. खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. (प्रतिनिधी)