रोहिंग्यांनी देहूरोडमध्ये बांधले घर; घुसखोरी करून १२ वर्षांपासून वास्तव्य
By नारायण बडगुजर | Published: December 11, 2024 07:30 PM2024-12-11T19:30:22+5:302024-12-11T19:31:13+5:30
पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी शाखेची कारवाई
पिंपरी : म्यानमारच्या दोन रोहिंग्या कुटुंबीय भारतात वास्तव्य करत असल्याचे समोर आले होते. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी शाखेने २७ जुलै २०२४ रोजी देहूरोड येथे कारवाई केली होती. या रोहिंग्यांनी देहूरोड येथे स्वतःचे घर बांधल्याचे उघड झाले असून त्यामुळे खळबळ उडाली आहे.
देहूरोडमध्ये राहणाऱ्या म्यानमारच्या मुजम्मिल मोहम्मद अमीन खान (वय ४३) आणि शाहीद ऊर्फ सोहिद्दुल शेख (३५) या दोघांसह त्यांच्या पत्नी, अशा चार रोहिंग्यांवर भारतात बेकायदेशीर वास्तव्य केल्याप्रकरणी कारवाई केली होती. देहूरोड पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर तपासादरम्यान पोलिसांनी त्यांच्याकडून फोन, सिमकार्ड, आधारकार्ड, पॅनकार्ड, बांगलादेशी चलन, भारतीय पासपोर्ट जप्त केला.
शेख भाड्याच्या खोलीत, तर खान देहूरोड येथे स्वतःचे घर बांधून राहत असल्याचे समोर आले. पत्नी आणि दोन मुलींसह खान म्यानमारमध्ये राहत होता. मात्र, त्याने कुटुंबासह बांगलादेशात स्थलांतर केले. तेथे ‘रेफ्युजी कॅम्प’मध्ये काही काम न मिळाल्याने त्याने भारतात पश्चिम बंगालमध्ये घुसखोरी केली. तेथून तो रेल्वेने पुण्यात आला आणि तळेगाव एमआयडीसीतील कंपनीत नोकरीला लागला. त्यानंतर त्याने देहूरोड येथे लहान मुलांचे कपडे विकण्यास सुरुवात केली. त्याने भिवंडी येथील एका दुकानातून कोणतेही कागदपत्र न देता ५०० रुपयांत आधारकार्ड मिळविले. त्यानंतर त्याने पत्नीचेही आधारकार्ड घेतले. त्यानंतर खान याने स्थानिक बाजारात सुपारी विकायला सुरुवात केली.
भारतीय पासपाेर्टही मिळवला
देहूरोड येथील गांधीनगर परिसरात खान याने ८० हजार रुपयांत ६०० चौरस फूट जागा घेतली. या व्यवहाराची कोणतीही कागदपत्रे तयार न करता त्याने घरही बांधले. सुपारी विक्रीचे काम करताना त्याने भारतीय पासपोर्ट देखील मिळवला.
सध्या संशयित जामिनावर बाहेर आहेत. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्यांना भारताबाहेर जाण्यास परवानगी नाही. याप्रकरणात संशयित दोषी ठरल्यास न्यायालयाने दिलेली शिक्षा भोगल्यानंतर त्यांना न्यायालयाच्या आदेशाने भारताबाहेर त्यांच्या मायदेशी पाठविण्यात येईल. - विकास राऊत, पोलिस निरीक्षक, दहशतवाद विरोधी शाखा, पिंपरी-चिंचवड