चिखलीमध्ये घराला आग, जीवनावश्यक साहित्य जळाले
By विश्वास मोरे | Published: January 17, 2024 05:44 PM2024-01-17T17:44:59+5:302024-01-17T17:45:17+5:30
प्रत्येक नागरिकाने घरातून बाहेर पडताना घरातील गॅस व लाईटचे स्वीच बंद करावेत, देवघरात लावलेला दिवा देखील विझवून जावे
चिखली: चिखली येथील संतकृपा हौसिंग सोसायटी मधील पहिल्या मजल्यावर असलेल्या घराला सकाळी साडेदहाच्या सुमारास आग लागून घरातील संसारोपयोगी साहीत्य जळून खाक झाले. संतकृपा सोसायटी मध्ये माणीक घोडके यांचे एक गुंठ्यात घर असून सकाळी सर्वजण कामाला गेल्यानंतर घरात अचानक आग लागल्याचे नागरीकांच्या लक्षात आले. आग लागल्यानंतर तात्काळ काही रहिवाशांकडून अग्निशामक दलाला पाचारण केले. मात्र, अरूंद रस्त्यामुळे बंब घटनास्थळी पोहचण्यास अडथळा आला, अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी धावत जाऊन घरातील आग विझवली. त्यामुळे घरातील ईतर सामान वाचले गेले.
चिखली परिसरात अनेक ठिकाणी छोटे छोटे भुखंड खरेदी करून औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांकडून घरे बांधून संसार थाटले गेले. मात्र अशा आपत्कालीन घटनेच्या वेळी रस्ते अरूंद असल्याने वेळेवर मदत पोहचण्यास आडथळे निर्माण होत असल्याचे आग्नीशामक विभागातील कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले.
अग्नीशामक विभागाकडून आवाहन
प्रत्येक नागरिकाने घरातून बाहेर पडताना घरातील गॅस व लाईटचे स्वीच बंद करावेत, देवघरात लावलेला दिवा देखील विझवून जावे. स्वतःच्या घरात आगीच्या दुर्घटना घडणार नाहीत याची सर्वतोपरी नागरीकांनी काळजी घ्यावी. ज्या ठिकाणी छोट्या गल्ल्या आहेत अशा ठिकाणी नागरीकांनी आपली वाहने रस्त्यावर पार्क न करता घराच्या पार्कींग मध्येच पार्क करावीत आपत्कालीन सेवा देणारी वाहने तात्काळ पोहचतील याची दखल नागरीकांनी घ्यावी असे आवाहन अग्निशामक विभागाकडून करण्यात येत आहे.