पिंपरी चिंचवडमध्ये घरगुती गणपतींच्या विसर्जनाला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2017 01:19 PM2017-09-05T13:19:25+5:302017-09-05T13:21:09+5:30
पिंपरी चिंचवड, दि. 5 - लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी पिंपरी चिंचवड उद्योगनगरी परिसरातील 26 विसर्जन घाटांवर तयारी पूर्ण झाली आहे. कडेकोट पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्हीची नजर या विसर्जन सोहळ्यावर असणार आहे. सकाळी 7 वाजल्यापासून पिंपरीतील झुलेलाल घाटावर तसेच चिंचवड येथील पवना नदी घाटावर घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यात येत आहे.
'गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. . . गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या. . .' अशा जयघोषात पिंपरी-चिंचवडसह काळेवाडी, थेरगाव, रावेत, किवळे, प्राधिकरण, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव या परिसरातही गणपती विसर्जन केले जात आहे. विसर्जन मिरवणुकीमुळे पिंपरी चिंचवडमधील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाचे पथक तसेच अग्निशामक दलाचे पथक, डॉक्टरांचे विशेष पथक ही सज्ज आहे. पिंपरी, चिखली, थेरगाव, चिंचवड या घाटांवर अग्निशामक दलाच्यावतीने तीन बोटी तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच लाईफ जॅकेट, लाईफ रिंग, गळही ठेवण्यात आले आहेत.
पिंपरीतील मिरवणूक स्वर्गीय इंदिरा गांधी उड्डाणपुलावरून शगुन चौक मार्गे कॅम्प, लिंकरोड पवना नदी घाटावर जाणार आहे . तसेच चिंचवड परिसरातील मिरवणूक चापेकर चौक वाल्हेकरवाडी जकात नाका येथून थेरगाव-पवना नदी घाटावर जाणार आहे. दुपारी 1 वाजल्यानंतर मिरवणुकांची सुरुवात होणार आहे . दोन्ही चौकात पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पुणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने स्वागत काही कक्ष उभारण्यात आले आहेत. विविध सामाजिक संस्थांच्यावतीने गणपती मूर्ती दान मोहीम राबवण्यात आहे. त्यासाठी विसर्जन घाटावर स्वतंत्र हौद हा तयार करण्यात आले आहेत.