रोजचा खर्च भागवायचा कसा?
By admin | Published: December 22, 2016 02:05 AM2016-12-22T02:05:33+5:302016-12-22T02:05:33+5:30
नोटाबंदी करून ४२ दिवस उलटून गेले, तरी बँका व एटीएमसमोरील नागरिकांच्या रांगा कमी झालेल्या नाहीत. भोसरी औद्योगिक
भोसरी : नोटाबंदी करून ४२ दिवस उलटून गेले, तरी बँका व एटीएमसमोरील नागरिकांच्या रांगा कमी झालेल्या नाहीत. भोसरी औद्योगिक भागात हजारो कामगार देशाच्या कानाकोपऱ्यातून येऊन उदरनिर्वाहासाठी दिवसरात्र काबाडकष्ट करीत असतो. पगार मिळतो, पण बँकेत जमा झालेला पगार कित्येक दिवस हातात पडत नाही. आठवड्यातून सुटीचा पूर्ण दिवसही रांगेत जातो व फक्त २००० रुपये हातात मिळतात. या रकमेतून खोलीभाडे देणेही अशक्य आहे. त्यामुळे रोजचे इतर खर्च कसे भागवावेत, असा प्रश्न चाकरमान्यांसमोर आ वासून उभा राहिला आहे.
दर महिन्याच्या ७ ते १० तारखेच्या दरम्यान एमआयडीसीतील कंपन्यांत मासिक पगार होतात. ८ नोव्हेंबरला नोटबंदीचा झाल्यानंतर कारखानदारांनी कामगारांना जुन्याच नोटा पगारात दिल्या. त्या नोटा बाजारात चालत नसल्याने नाईलाजाने त्या बँकेत भरण्यासाठी दिवस-दिवस बँकांच्या रांगेसमोर नोटा भरण्यासाठी थांबावे लागते. कामगारांचे आर्थिक नुकसान होत आहे. नोटाबंदीनंतर दुसरा पगार हातात घेतानाही बऱ्याच कामगारांना जुन्याच ५०० व १०००च्या नोटा देण्याचा काही कारखानदारांनी प्रयत्न केला. बहुतांश परप्रांतीय कामगारांचे बँकांमध्ये खाते नसल्याने त्यांना जुन्या नोटांचे करायचे काय, असा प्रश्न पडला असून, चलनबंदीच्या निर्णयाचा मानसिक व आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
भोसरी परिसरात ठिकठिकाणी नाक्यावर थांबून मोलमजुरीची कामे करणाऱ्या कामगारांची संख्या जास्त आहे. असे कामगार बहुतांश असंघटित क्षेत्रातील आहेत. या कामगारांना काम मिळणे बंद झाले आहे. एखाद-दुसरे काम मिळाले, तरी जुन्या नोटा स्वीकाराव्या लागत आहेत. हातावर पोट असलेले हे कामगार
सकाळी मेहनत करतात आणि सायंकाळी खातात. हातात
आलेली जुनी नोट अर्ध्या किमतीत विकून रेशन खरेदी करण्याची वेळ त्यांच्यावर आली असल्याचे कामगार सांगतात. बरेचसे परप्रांतीय कामगार कुटुंबाला महिन्याकाठी काही पैसे पाठवत असतात. (वार्ताहर)