वाहनातून प्रवास करताना चालकाची मानसिक स्थिती कशी समजणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2022 01:33 PM2022-09-09T13:33:19+5:302022-09-09T13:34:33+5:30
वाहन चालविणारा मानसिक अथवा शारीरिकदृष्ट्या अयोग्य असल्यास त्याचा इतरांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो...
- नारायण बडगुजर
पिंपरी : टाटा उद्योग समुहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. वाहन चालविणारा मानसिक अथवा शारीरिकदृष्ट्या अयोग्य असल्यास त्याचा इतरांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे वाहनातून प्रवास करताना चालकाची मानसिक स्थिती लक्षात येणे गरजेचे आहे. अन्यथा हा प्रवास आपल्यासह इतरांच्याही जीवावर बेतू शकतो. त्यादृष्टीने वाहनातील सहप्रवाशांनी चालकाच्या मानसिक स्थितीचा अंदाज घेण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात किरकोळ तसेच प्राणांतिक अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अपघात रोखण्यासाठी पोलिसांकडून कारवाईसह उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, याबाबत वाहनचालक तसेच नागरिकांनीही पुढाकार घेतला पाहिजे. आपल्यामुळे इतरांचा जीव जाऊ नये, यासाठी वाहन चालकाने काळजी घ्यावी. शारीरिक व मानसिकदृष्ट्या थकवा आला असल्यास किंवा राग, ताण-तणाव असेल तर वाहन चालवू नये. मानसिक अथवा शारीरिकदृष्ट्या वाहन चालविण्यास अयोग्य असलेल्या व्यक्तीने वाहन चालविल्यास एक ते दोन हजार रुपयांच्या दंडाची तरतूद आहे. मात्र, चालकाची मानसिकता पोलिसांना कशी समजणार हाही प्रश्न आहे. त्यामुळे सहप्रवाशांनीच चालकाची मानसिकता ओळखून प्रवास करणे गरजेचे आहे.
चालकाची मानसिक, शारीरिक स्थिती अयोग्य असल्यास दंड
पहिल्यांदा अशाप्रकारे आढळल्यास संबंधित चालकावर एक हजार रुपये आणि असाच प्रकार दुसर्यांदा आढळल्यास दोन हजार रुपयांच्या दंडाची तरतूद कायद्यामध्ये आहे. मुळात चालकाची मानसिकता लक्षात येणे कठीण आहे. त्यामुळे असा दंड कसा करावा किंवा संबंधित चालक ‘त्या’ अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले तरच दंड लावता येऊ शकतो.
मानसिक स्थिती समजणे कठीणच
चालकाची मानसिक स्थिती ही केवळ वाहनात सहप्रवाशांना समजू शकते. तसेच चालकाच्या घरातील सदस्यांना याबाबत माहिती असू शकते. मानसिक स्थिती अयोग्य असल्यास चालकाला वाहन चालविण्यास देऊ नये, हा नियम कटाक्षाने पाळला पाहिजे.
कुटुंबातील सदस्यांना आपल्या घरातील व्यक्तीची पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. विशेषत: वाहन चालविण्यापूर्वी कोणताही ताणतणाव वाहन चालकावर नसावा तसेच संबंधित विभागांनी केवळ वैद्यकीय परीक्षा न घेता त्याबाबत मानसिकदृष्ट्या चालक संतुलित आहे की नाही, याचीही तपासणी करावी. पुरेशी झोप झाल्याशिवाय वाहन चालवू नये.
- डॉ. मनजित संत्रे, मानसोपचार तज्ज्ञ