HSC Result: वडीलांचे निधन, आई कचरा वेचायची; करिनाने जिद्दीने मिळवले बारावीत यश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 11:24 AM2024-05-22T11:24:48+5:302024-05-22T11:26:12+5:30
प्रतिकूल परिस्थितीत निगडीतील करिना लालबहादूर जैस्वालने बारावीत यश मिळविले आहे...
पिंपरी : डोक्यावरील वडिलांचे छप्पर गेले. आईने कचरा वेचून संसार केला. अशा प्रतिकूल परिस्थितीत निगडीतील करिना लालबहादूर जैस्वालने बारावीत यश मिळविले आहे. आकुर्डीतील गोदावरी महाविद्यालयातील करिनाने ८३. ६७ टक्के गुण मिळविले आहेत. करिना लालबहादूर जैस्वाल ही निगडी येथील अजंठानगरमधील पुनर्वसन प्रकल्पात राहते. तिच्या वडिलांचे निधन झाले असून आई शकुंतला देवी या कचरा वेचकाचे काम करतात. तिला एक बहीण आणि भाऊ आहे. आकुर्डीतील गोदावरी विद्यालयात इयत्ता दहावी मध्येही तिला ८६. ८७ गुण मिळाले होते. त्यानंतर गोदावरी कनिष्ठ महाविद्यालयातून वाणिज्य शाखेतून १२ वी पूर्ण केली.
यशाबद्दल करिना लालबहादूर जैस्वाल म्हणाली, 'शिकवणीसाठी परिस्थिती नव्हती. घरची परिस्थिती गरिबीची आहे. वडील नाहीत. आई कचरा वेचकाचे काम करते. नियमितपणे अभ्यास केला. त्यामुळे यश मिळाले. परिस्थिती सुधारायची आहे. मोठे व्हायचे आहे. कुटुंबाचा आधार व्हायचे आहे.'
करिनाने 'असा' केला अभ्यास-
करिनाची आई शकुंतलाबाई महापालिकेत घंटागाडीवर कचरा कामगार म्हणून काम करते. वडिलांचे २०१२ मध्ये निधन झाले. मोठी बहीण नेहा टाटा मोटर्समध्ये गुणवत्ता विभागाच्या असेंब्ली लाईनवर काम करते. करीना म्हणते, “पहाटे तीनपर्यंत अभ्यास करायचे, पण इंग्रजीचा पेपर वेळेत पूर्ण करू शकले नाही आणि १२ मार्काचा पेपर लिहिता आला नाही. मला बीबीए करायचे आहे पण फी जास्त आहे. कोणत्याही विषयाची शिकवणी लावली नाही आणि स्वतःच स्वतः अभ्यास केला.”