माझे तुझ्यावर प्रेम आहे म्हणत विवाहितेला घरच्यांसमोर मारली मिठी; युवकावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2022 13:45 IST2022-11-25T13:40:32+5:302022-11-25T13:45:01+5:30
भोसरीतील गणेश साम्राज्य चौकातील प्रकार...

माझे तुझ्यावर प्रेम आहे म्हणत विवाहितेला घरच्यांसमोर मारली मिठी; युवकावर गुन्हा दाखल
पिंपरी : एकतर्फी प्रेमातून तरुणाने एका विवाहित महिलेला वारंवार फोन करत तसेच तिच्या घरच्यांसमोर मिठी मारत विनयभंग केला. १२ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत भोसरीतील गणेश साम्राज्य चौकात हा प्रकार घडला.
या प्रकरणी २७ वर्षीय विवाहितेने बुधवारी (दि. २३) एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, सागर शालिग्राम भांरबे (वय २९, रा. धनकवडी, कात्रज) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे अभियांत्रिकी महाविद्यालयात एकत्र शिक्षण घेत होते. तेव्हापासूनची त्यांची ओळख व मैत्री होती. आरोपीचे फिर्यादी यांच्यावर एकतर्फी प्रेम आहे. या एकतर्फी प्रेमातून आरोपीने वारंवार फिर्यादी यांच्या मोबाईलवर फोन केले. फिर्यादी यांचे आरोपीबरोबरचे फोटो मोबाईलवर पाठविले. त्यासोबतच माझे तुझ्यावर प्रेम आहे. ती माझ्याशिवाय कोणाचीच होऊ शकत नाही, असे मोठ्याने सांगत आरोपीने फिर्यादी यांच्या आई, वडील आणि पतीसमोर मिठी मारली. त्यावेळी पतीने फिर्यादी यांना आरोपीच्या ताब्यातून सोडविले. याचा राग आल्याने तुम्हाला सोडणार नाही, तुम्हाला पाहून घेईन, अशी आरोपीने धमकी दिली.