लॅपटॉपवरील हातांनी जपली माणुसकी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2018 12:34 AM2018-11-11T00:34:53+5:302018-11-11T00:35:14+5:30

आयटीयन्स अभियंता : शेअरिंग स्माईल ग्रुपच्या माध्यमातून दुर्गम भागातील नागरिकांना, विद्यार्थ्यांना मदत

Human hands on the laptop | लॅपटॉपवरील हातांनी जपली माणुसकी

लॅपटॉपवरील हातांनी जपली माणुसकी

Next

वाकड : आयटी पार्क हिंजवडीसह, खराडी, मगरपट्टा, शिवाजीनगर, तळवडे व तळेगाव येथे आयटी कंपनीत नोकरी करणाऱ्या आयटीयन्स तरुणांनी एकत्र येत ‘शेअरिंग स्माईल’ या ग्रुपची स्थापना केली आहे. त्याद्वारे स्वत:च्या खिशाला कात्री लावून आणि सुट्टीचा वेळ सत्कारणी लावत मागील नऊ वर्षांपासून दुर्गम भागातील आदिवासी, गरजू रहिवासी आणि गुणवंत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न सातत्याने ते करत आहेत.

यंदाच्या वर्षी ‘सेल्फ एम्लायॉमेंट’ या उपक्रमा अंतर्गत गाई, शेळी, कोंबड्या, विद्यार्थ्यांना सायकल वाटप, विद्यार्थ्यांची शाळेची फी भरणे, फराळवाटप अशा विविध उपक्रमांद्वारे लोकांना स्वयंरोजगाराची साधने उपलब्ध करून दिली. लॅपटॉप मॅन अशी ओळख असणाºया त्या आयटीयन्स तरुणांनी समाजाला एक आदर्श घालून देत आॅनलाइनपेक्षाही आॅफलाइन जगतात मोलाची कामगिरी करीत असल्याचे दाखवून दिले आहे. यंदा या शेअरिंग स्माईल ग्रुपने तब्बल ८२ कुटुंबांना मदतीचा हात दिला आहे. कोटमवाडी (पवनानगर मावळ) गावातील दोन कुटुंबांना सात देशी गायींचे व एका खिलार गाईचे वाटप, आठ कुटुंबांना प्रत्येकी दोन-दोन शेळ्या वाटप, चार महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा याकरिता कापडी पिशव्या शिवण्याचा रोजगार देण्यात आला. तर मळवंडी गावात एका कुटुंबाला अंडी व्यवसायाकरिता २५ कोंबड्याचे वाटप, शिवणे गावातील १२ वीत शिकणाºया विद्यार्थिनीला तीन किमीचा टप्पा पायी पार करून ये-जा करावी लागत असल्याने तीला सायकल भेट व तिच्या कुटुंबीयांना १५ कोंबड्या वाटप, एका गरीब कुटुंबातील विद्यार्थिनीची संपूर्ण शैक्षणिक वर्षाची महाविद्यालयीन फी भरली, शिळीम या गावात चार कुटुंबांना प्रत्येकी दोन-दोन शेळीवाटप करण्यात आले. जांभुळणे गावात २० कुटुंबांना अन्नधान्य आणि फराळ त्याबरोबर गावातील प्रत्येक महिलेला प्रत्येकी तीन साड्या तर लहान मुलांचे कपडे व ज्येष्ठ नागरिकांना उबदार कपडे भेट देण्यात आले.
पैशांची मदत करणारे काही जण परदेशात तर काही जण बंगळूर, हैद्राबाद या परराज्यातदेखील बदली झाल्याने नोकरी करतात़ मात्र लोकांच्या प्रती असलेल्या आत्मीयतेमुळे त्यांची मदत कधीही थांबली नसल्याचे सूरज दिघे सांगतात. यंदा अडीच लाख रुपये जमा करून त्याचा गरजू लोकांसाठी वापर करण्यात आला आहे. केवळ दिवाळीपूरता हा उपक्रम सिमित न ठेवता कामाची व्याप्ती वाढवून दर महिन्याला विविध गोष्टी करण्याचा संकल्प यंदाच्या वर्षांपासून करण्यात आला आहे. केवळ मदत करून काम संपले असेही नाही तर संबंधित व्यक्तीचा वेळोवेळी आढावादेखील घेण्यात येतो़ त्याद्वारे या मदतीचा वापर ती व्यक्ती कशी करते स्वत:ची प्रगती साधते की नाही यावर बारकाईने लक्ष ठेवून तो स्वावलंबी होत स्वत:च्या पायावर उभा राहण्यासाठी मदत करणार आहे़ त्यामुळे शेअरिंग स्माईलच्या उपक्रमात अधिकाधिक तरुणांनी सहभागी व्हावे, असे आवाहन रवींद्र वाकडकर यांनी केले आहे.
या ग्रुपमधील बहुतेक सर्व सभासद उच्चशिक्षित आयटी अभियंते आहेत़ एमबीए, डॉक्टर, आर्टिस्ट, सी.ए़ असे वेगळ्या फिल्डमधील तरुण सहभागी झाले आहेत. तर तब्बल ७० टक्के तरुण-तरुणी आयटी पार्क हिंजवडीतील आहेत.

दिवाळी : मिठाईवाटप
शेअरिंग स्माईलचे सदस्य सूरज दिघे, विनायक मावकर, अमोल अकोलकर, अजय शिंदे, रोहित भेगडे, पुष्पराज कुंभारकर म्हणाले अंध, मतिमंद अशा दिव्यांग मुलांच्या चेहºयावरील आनंद महत्त्वपूर्ण असल्याने त्यांच्या आनंदात आम्हाला समाधान मिळत असल्याने यंदाच्या वर्षी इंदोरी येथील अंध मुलांच्या आश्रमात आणि तळेगाव येथील जीवनधारा मतिमंद मुलांच्या शाळेत दिवाळीनिमित्त मिठाईवाटप करण्यात आली. अमोल अकोलकर म्हणाले, आपली मुले इंग्रजी शाळेत जाऊन मस्त पोयम म्हणतात़ मात्र त्यांनी पोयम बरोबरने तुकोबारायांची व माऊलींच्या ओव्यांची माहती ठेवून आपली मराठी संस्कृती व परंपरा जपावी. मोबाइलच्या अती वापर टाळून संवाद हरवू देऊ नये.

४पुणे-लोणावळा लोकलने नोकरीला जाता येता दैनंदिन प्रवासादरम्यान या तरुणांच्या विचारांना चालना मिळाली़ समाजासाठी काही तरी करायला हवे या एकाच नि:स्वार्थी हेतूने सुमारे शंभरहून अधिक आयटीयन्स तरुण-तरुणी एकत्र आल़े त्यातून पहिला उपक्रम सूचला तो म्हणजे फटाक्यांची आतषबाजी न करता विधायक पद्धतीने वंचित लोकांपर्यंत पोहोचत त्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण निर्माण करण्याचा. वडगाव (मावळ) तालुक्यातील दुर्गम पवनानगर परिसरातील कोटमवाडी, जांभूळणे, शिळीम, कोळेचाफेसर या गावांत प्रत्यक्षरित्या जाऊन या तरुणांनी नागरिकांच्या व्यथा जाणून घेत मदत केली आहे. या ग्रुपमधील बहुतेक सर्व सभासद उच्चशिक्षित आयटी अभियंते आहेत़
 

Web Title: Human hands on the laptop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.