रुग्णवाहिका यंत्रणा अपयशी; माणुसकी जिवंत : मरणासन्न "ती"च्या मदतीला धावले कार्यकर्ते
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 04:43 PM2020-04-25T16:43:20+5:302020-04-25T17:09:44+5:30
संपुर्ण कुटुंबातील व्यक्तींचे वेगवेगळ्या कारणाने निधन झाल्याने ती अस्वस्थ होऊन घरीच पडून राहिली...
पराग कुंकुलोळ-
पिंपरी : रुग्णालयाचे दरवाजे झिजविल्यानंतर 'ती'च्यावर योग्य इलाज होईना व कोणी भरती सुद्धा करून घेईना. त्यामुळे आठ दिवस अंधाऱ्या खोलीत ती निराधार मरणासन्न अवस्थेत यातना भोगत होती. अखेर या अनाथ मुलीच्या मदतीला परिसरातील कार्यकर्ते धावले.
कार्यकर्त्यांनी तिला रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिकेशी अनेकदा संपर्क केला. तरीही रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. अखेर स्थानिक नगरसेवकांनी खासगी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
चिंचवड मधील भोईरनगर येथे ही ३२ वर्षीय मुलगी अशक्तपणा व खोकला येत असल्याने काही दिवसांपासून घरात यातना भोगत होती. घराच्या बाजूला असणाऱ्या सार्वजनिक शौचालयातून येणारी दुर्गंधी आणि भयावह वाटणाऱ्या तिच्या घरात ती धापा टाकत होती.ती रुग्णालयात उपचारासाठी जाऊन आली.मात्र तात्पुरती तपासणी करून तिला घरी पाठविण्यात आले.दिवसेंदिवस तिची प्रकृती खालावत गेली. शेजारचे काहीजण अनाथ असल्याने तिला जेवण देऊन विचारपूस करत होते.मात्र दिवसेंदिवस तिच्या वेदना वाढत राहिल्या.संपुर्ण कुटुंबातील व्यक्तींचे वेगवेगळ्या कारणाने निधन झाल्याने ती अस्वस्थ होऊन घरीच पडून राहिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनीच तिच्याशी असलेला संपर्क बंद केला. तिला गरज होती ती उपचारांची. मात्र तिची परिस्थिती पाहून परिसरातील डॉक्टरांनी तिला दाखल करून घेण्यासाठी असमर्थता दर्शविली.
या मुलीचे आई-वडील आणि भाऊ यांचे निधन झाले आहे.मोठया बहिणीचे लग्न झाल्याने ती सासरी मुंबईत असते.काही दिवस ती एका मेडिकल दुकानात कामाला जात होती.मात्र त्रास होत असल्याने तिने जाणे बंद केले.घरात एकटीच रहात असल्याने तिच्या अडचणी वाढत गेल्या.ही बाब स्थानिक कार्यकर्त्यांना समजली.त्यांनी त्वरित मदतीसाठी 'लोकमत' प्रतिनिधीशी संपर्क साधला.तिला उपचाराची आवश्यकता असल्याने रुग्णवाहिकेसाठी संपर्क केला.मात्र त्यांच्या कडून प्रश्नांची सरबत्ती सोडून कोणताही सुविधा उपलब्ध झाली नाही.वारंवार संपर्क करूनही अडीचतास रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही.
---
नगरसेवकाच्या मदतीने रुग्णवाहिका...
अखेर स्थानिक नगरसेवक शीतल शिंदे यांनी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. नगरसेविका माधुरी कुलकर्णी यांनी रुग्णालय प्रशासनाशी संपर्क करून उपचार व्यवस्थेसाठी सहकार्य केले. स्थानिक कार्यकर्ते अमित जाधव, सचिन सकोरे,विशाल रुकारी हे सर्वजण मदतीसाठी धावून आले. परिसरातील सामाजिक कार्यकर्ते रवी शेट्टी व लखन भंडारे हे रुग्णवाहिकेसह तिला घेऊन रुग्णालयात गेले.रात्री उशिरापर्यंत तपासणी झाल्यावर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रसंगावधान पाहून कार्यकर्ते मदतीला धावल्याने समाजात अजूनही माणुसकी जिवंत असल्याचा प्रत्यय या घटनेतून आला आहे.