नियतीवर केली माणुसकीने मात, कुटुंबीयांचाही घेतला शोध
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2018 02:25 AM2018-11-06T02:25:09+5:302018-11-06T02:27:06+5:30
रस्त्याच्या कडेला एकजण बेशुद्धावस्थेत पडलेला... त्यास रुग्णालयात नेण्यात आले... अर्धांगवायूचा झटका आल्याने त्याची वाचाही गेलेली... उपचारानंतर काही दिवसांनी प्रकृतीत सुधारणा झाली.
- बेलाजी पात्रे
वाकड - रस्त्याच्या कडेला एकजण बेशुद्धावस्थेत पडलेला... त्यास रुग्णालयात नेण्यात आले... अर्धांगवायूचा झटका आल्याने त्याची वाचाही गेलेली... उपचारानंतर काही दिवसांनी प्रकृतीत सुधारणा झाली. रुग्णालयातून सोडायचे, तर नाव, गाव, पत्ता, नातेवाईक याची काहीच माहिती नाही. वाचा गेल्याने खाणाखुणा करून सांगण्याचा त्याचा प्रयत्न अयशस्वी ठरत होता. काहीही लक्षात येत नव्हते. थरथरत्या हाताने संभाजी श्रीराम पांचाळ असे त्याने स्वत:चे नाव लिहून दाखविले.
कुटुंबीयांचा शोध घेण्यासाठी एवढाच काय तो आशेचा किरण ठरला. हाताने हावभाव करीत तो पत्ता सांगण्याचा प्रयत्न करू लागला. अंदाज बांधत रुग्णवाहिकेतून त्यास शहराच्या काही भागात फिरविले असता, आळंदीजवळ मरकळ येथे येताच हातवारे करून थांबण्यास सांगितले. परिसरात चौकशी केली असता, पांचाळ कुटुंबीय तेथेच राहत असल्याची माहिती मिळाली. कुटुंबापासून ताटातूट झालेले संभाजी पांचाळ तब्बल सव्वा महिन्याने स्वत:च्या घरी पोहोचले. कुटुंबाचा आधारवड पुन्हा मिळाल्याने कुटुंबीयांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.
मरकळ येथील रहिवासी संभाजी श्रीराम पांचाळ हे १० सप्टेंबरला सकाळी कामाला जाण्यासाठी घराबाहेर पडले. नियतीच्या खेळ असा की, देहू फाटा, आळंदी येथे रस्त्याच्या कडेला ते ग्लानी येऊन बेशुद्धावस्थेत पडले. कोणीतरी १०८ टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून रुग्णवाहिका बोलावली. त्यांना महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी त्यांची शुश्रूषा केली.
कुटुंबाला पुन्हा मिळाला आधारवड
पोलिसांकडे बेपत्ता अशी नोंद झाली असली, तरी संभाजी कुठून, कसे तरी पुन्हा घरी येतील अशी आस लावून पांचाळ कुटुंबीय बसले होते. अशातच ३१ आॅक्टोबरला दुपारी कोणाच्याही ध्यानीमनी नसताना अचानक दारासमोर रुग्णवाहिका येऊन थबकली. या रुग्णवाहिकेतून संभाजी खाली उतरले. तब्बल सव्वा महिन्याने घराचा आधारवड असलेले संभाजी यांना सुखरूप घरी आल्याचे पाहून कुटुंबीयांचा जीव भांड्यात पडला. आई, पत्नी आणि मुलगा यांची भेट होताच पांचाळ यांचे दोन्ही हात आपोआप जोडले गेले. नियतीवर माणुसकीने मात केली. मदतकर्त्यांबद्दलची कृतज्ञतेची भावना त्यांच्या डोळ्यात दिसून आली. कुटुंबीयांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. शेजाऱ्यांचेही डोळे पाणावले. संभाजी यांच्या मातु:श्री धाय मोकलून रडू लागल्या. हा प्रसंग पाहून रिअल लाईफ रिअल पीपल संस्थेच्या पदाधिकाºयांनाही गहिवरून आले.
सुटकेचा नि:श्वास सोडला
वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते बोत्रे, तसेच रिअल लाइफ रिअल पीपल संस्थेचे हुसेन यांनी रुग्णाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. वाचा गेली असल्याने त्यांना काहीही समजत नव्हते. हातवारे करीत त्यांच्याकडून नाव, पत्ता मिळविण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी त्यांनी संभाजी श्रीराम पांचाळ असे स्वत:चे नाव लिहून दाखविले. नाव मिळाले; त्याआधारे पुढील माहिती मिळविण्याचा कसोशीने प्रयत्न झाला. हातवारे, खाणाखुणा करीत त्यांच्याकडून पत्ता मिळविण्याचा प्रयत्न झाला. ते हातवारे करीत काही तरी सांगण्याचा प्रयत्न करीत होते. त्यानुसार अंदाज बांधून रुग्णवाहिकेतून ठिकठिकाणी त्यांस फिरविण्यात आले. आळंदी, मरकळजवळ येताच ते थांबण्याचा इशारा करू लागले. रुग्णवाहिका थांबवली. तेथे पांचाळ यांना उतरविले. त्यांना ओळखणारे काही लोक भेटले. अखेर पत्ता मिळाला, याचा आनंद सर्वांना झाला. सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
रिअल लाईफ रिअल पीपल
‘रिअल लाईफ रिअल पीपल’ या समाजसेवी संस्थेचे पदाधिकारी एम. ए. हुसेन, तसेच आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, अधीक्षक डॉ. मनोज देशमुख, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. शंकर जाधव, डॉ. प्रवीण गायकवाड, परिचारिका यांच्यासह वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते महादेव बोत्रे, भाग्यश्री डोंगरे, वर्षा भोसले यांनी विशेष लक्ष देऊन रुग्णास सर्वतोपरी मदत केली. शुश्रूषा करण्यास कोणी नातेवाईक नसल्याचे त्यांना जाणवू दिले नाही. अशा प्रकारे नियतीच्या खेळावर माणुसकीने मात केली.