कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मालमत्ताधारकांच्या कुटुंबियांना सामान्य करात मिळणार १०० टक्के सवलत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2021 08:27 PM2021-12-08T20:27:44+5:302021-12-08T20:31:36+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत ४ हजार ५१३ जणांचा मृत्यू झाला आहे...
पिंपरी : कोरोनाच्या महामारीमुळे औद्योगिकनगरी पिंपरी-चिंचवडमधील साडेचार हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या शहरातील मालमत्ताधारकांच्या कुटुंबियांना आगामी आर्थिक वर्षात सामान्य करात १०० टक्के सवलत दिली जाणार आहे. तसेच मालमत्ता हस्तांतरण नोंद नोटीस फी देखील माफ करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेतला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत ४ हजार ५१३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या मिळकती हस्तांतरण करण्यासाठी महापालिकेच्या मिळकतकर विभागाने मोहीम राबविली आहे. महापालिकेच्या स्थायी समितीसमोर आगामी आर्थिक वर्ष २०२२ - २३ मध्ये मालमत्ताकराचे दर जैसे थे ठेवण्याचा प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवला होता. अध्यक्षस्थानी नितीन लांडगे होते. या प्रस्तावाला एकमताने मंजुरी देण्यात आली. अंतिम मान्यतेसाठी सर्वसाधारण सभेकडे शिफारस केली आहे.
प्रस्तावास उपसूचना
या प्रस्तावाला कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मालमत्ता धारकांच्या कुटुंबियांना सामान्य करात १०० टक्के सवलत देण्याची उपसूचना देण्यात आली. स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे म्हणाले, ‘‘सन २०२० - २१ आणि २०२१ - २२ या कालावधीत महापालिका हद्दीमधील ज्या निवासी मालमत्ताकर धारकांचे कोरोना या महामारीने मृत्यू झालेला आहे. त्यांच्या नावावर मालमत्ता आहे. अशा कुटुंबाला दिलासा देण्यासाठी आगामी २०२२ - २३ या आर्थिक वर्षात कराचे व करेत्तर बाबीचे दर निश्चित करताना सवलत द्यावी. या मालमत्तांना चालू वषार्तील मागणीतील देय सामान्य कर रकमेच्या १०० टक्के सवलत द्यावी. तसेच मालमत्ता हस्तांतरण नोंद नोटीस फी मालमत्ताधारकांच्या कुटुंबियांना माफ करण्यात यावी. त्याचबरोबर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मालमत्ताधारकांच्या मालमत्ता हस्तांतरण करण्याच्या मोहिमेला मुदतवाढ दिली. ३१ जानेवारी २२ पर्यंत ही योजना राबविण्यात येणार आहे. त्याला उपसूचनेद्वारे मान्यता देण्यात आली.