PCMC| पाच वर्षांत विद्यमान ५५ नगरसेवकांवर गुन्ह्यांची ‘शंभरी’

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2022 07:31 PM2022-02-19T19:31:35+5:302022-02-19T19:33:12+5:30

राजकीय पक्षांकडून पायघड्या?...

hundreds of crimes against 55 existing corporators in five years | PCMC| पाच वर्षांत विद्यमान ५५ नगरसेवकांवर गुन्ह्यांची ‘शंभरी’

PCMC| पाच वर्षांत विद्यमान ५५ नगरसेवकांवर गुन्ह्यांची ‘शंभरी’

googlenewsNext

नारायण बडगुजर

पिंपरी : शहरातील गुन्हेगारी वाढत असतानाच विद्यमान नगरसेवकांवर गुन्हे दाखल होण्याचे प्रकार वाढले आहेत. महापालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत विजयी झालेल्या पैकी २१ उमेदवारांवर गुन्हे दाखल होते. त्यात अडीच पटीने वाढ होऊन गुन्हे दाखल असलेल्या विद्यमान नगरसेवकांची संख्या ५५ झाली आहे. पाच वर्षांत या नगरसेवकांवर शंभरावर गुन्हे दाखल करण्यात आले.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकारण तापले आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. यात नगरसेवकांच्या चारित्र्याचा मुद्दाही उपस्थित केला जात आहे. स्वच्छ चारित्र्य व प्रतिमा असल्याचे काही जणांकडून मिरविण्यात येत आहे. असे असले तरी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी विद्यमान नगरसेवकांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. हे सर्व गुन्हे लोकहिताची कामे करताना दाखल झाले आहेत का, असा सवाल सामान्यांकडून केला जात आहे.

नगरसेवक आहेत की, गल्लीबोळातील ‘भाई’?

सर्वसामान्यांचे लोकप्रतिनिधी म्हणून महापालिकेच्या सभागृहात नगरसेवक एकमेकांवर आरोप करतात. राजकीयदृष्टीकोनातून चिखलफेक करतात. यात बहुतांश वेळा विकासाचा मुद्दा बाजूला पडल्याचे दिसून येते. गल्लीबोळातील ‘भाई-दादा’ असल्यासारखे काही जणांवर गुन्हे दाखल झाल्याचे दिसून येते. त्यामुळे शहरवासीयांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

राजकीय पक्षांकडून पायघड्या?

महापालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत १२८ नगरसेवक निवडून आले होते. त्यातील चार नगरसेवक मयत झाले. सध्याच्या १२४ नगरसेवकांपैकी ५५ जणांवर पाच वर्षांच्या कालावधीत विविध गुन्हे दाखल करण्यात आले. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले हे नगरसेवक ‘मनी’ आणि ‘मसल’ पावरचा वापर करून पुन्हा निवडून येऊ शकत असल्याचा ‘तर्क’ लावण्यात येत आहे. त्यामुळे विविध राजकीय पक्षांकडून त्यांना पायघड्या घालण्यात येत आहेत.

खुनाचा प्रयत्न तसेच लाच घेण्यासह खंडणीसारखे गंभीर गुन्हे

आंदोलन, मोर्चे यासह प्रतिंबधात्मक कारवाई अंतर्गत दाखल करण्यात आलेले राजकीय स्वरुपाचे गुन्हे देखील विद्यमान नगरसेवकांवर दाखल झाले आहेत. तसेच खुनाचा प्रयत्न, मारहाण, दुखापत, सरकारी कामात अडथळा आणणे, जमीन-मिळकतीशी संबंधित गुन्हे तसेच लाच घेण्यासह खंडणीसारखे गुन्हे देखील दाखल झाले. अशा गुन्ह्यांमध्ये काही नगरसेवकांना पोलिसांनी अटक देखील केली होती.

भाजपसह राष्ट्रवादीचे नगरसेवक ‘टाॅप’वर

महापालिकेत भाजप सत्ताधारी पक्ष आहे. तर राष्ट्रवादी काॅंग्रेस मुख्य विरोधी पक्ष आहे. यात सर्वाधिक गुन्हे भाजपच्या नगरसेवकांवर तर त्याखालोखाल राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नगरसेवकांवर दाखल झाले आहेत. यासह शिवसेना अपक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवकांवरही गुन्हे दाखल झाले.

गुन्हे दाखल असलेले नगरसेवक

भाजप - २८
राष्ट्रवादी - १९
शिवसेना - ५
अपक्ष - २
मनसे - १

Web Title: hundreds of crimes against 55 existing corporators in five years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.