गोंधळ घातल्याने नगरसेविकेचे पती गजाआड
By admin | Published: June 27, 2017 07:37 AM2017-06-27T07:37:16+5:302017-06-27T07:37:16+5:30
पोलीस कर्मचाऱ्यास धक्काबुक्की, शिवीगाळ करणाऱ्या भाजपा नगरसेविकेच्या पतिराजाला सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी निगडी पोलिसांनी अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : पोलीस कर्मचाऱ्यास धक्काबुक्की, शिवीगाळ करणाऱ्या भाजपा नगरसेविकेच्या पतिराजाला सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी निगडी पोलिसांनी अटक केली. अनिल उर्फ बापू अभिमान घोलप असे आरोपीचे नाव आहे. भाजपाच्या प्रभाग क्रमांक १३ च्या नगरसेविका कमल घोलप यांचे ते पती आहेत.
पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार निगडी ओटास्किम येथील रहिवासी अनिल घोलप (वय ४०) हा आरोपी राजू नामदेव रिठे (वय २२) या कार्यकर्त्याला बरोबर घेऊन रविवारी रात्री बारा वाजता यमुनानगर पोलीस चौकीत आला. माझ्या वॉर्डातील लोकांची फिर्याद का दाखल करून घेत नाही, असे म्हणून तेथील पोलीस कर्मचाऱ्यांशी वाद घातला. मात्र, मूळ तक्रारदार कोण आहे, त्यांना घेऊन या, त्यांचे म्हणणे ऐकूण घेऊन तक्रार नोंदवता येईल, असे पोलीस कर्मचाऱ्यांनी समजून सांगितले. परंतु पोलिसांचे ऐकूण न घेता, पोलीस हवालदार आठवले यांना शिवीगाळ केली. आठवले यांच्याशी आरे तुरेची भाषा करीत, आठवले, ‘‘मी नगरसेवक आहे, हे तुला माहित नाही का ?’’ असे शब्द वापरून शिवीगाळ, धक्काबुक्की केली. सहायक पोलीस निरीक्षक साबळे यांनाही शिवीगाळ केली. एवढेच नव्हे तर पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांनाही धमकी दिली. ड्युटीवरील पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण, शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आरोपी घोलप याच्याविरोधात निगडी पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार नागेंद्र निगाप्पा बनसोडे यांनी फिर्याद दाखल केली आहे.