Pune Crime | गळा, तोंड दाबून पत्नीचा पतीने केला खून; पोत्यात कुजलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 21:17 IST2022-03-24T21:11:07+5:302022-03-24T21:17:08+5:30
खुनाचे कारण अजून समजू शकले नाही...

Pune Crime | गळा, तोंड दाबून पत्नीचा पतीने केला खून; पोत्यात कुजलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
पिंपरी : पतीने गळा व तोंड दाबून पत्नीचा खून केला. त्यानंतर एका पोत्यातून मृतदेह घराजवळील तळ्यालगत असलेल्या चारीमध्ये टाकला. कातकरी वस्ती, तळेगाव दाभाडे येथे बुधवारी (दि. २३) रात्री पावणेआठच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. खुनाचे कारण समजू शकले नाही.
तारा नईम शेख (वय ४०, रा. कातकरी वस्ती, तळेगाव दाभाडे) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. नईम नसरुद्दीन शेख (रा. कातकरी वस्ती, तळेगाव दाभाडे) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक अनिकेत हिवरकर यांनी याप्रकरणी गुरुवारी (दि. २४) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत तारा हिच्या पहिल्या पतीचे निधन झाले. त्यानंतर मयत तारा आणि आरोपी नईम हे दोघेही पती-पत्नी म्हणून एकत्र राहत होते. त्यांना तीन मुली व एक मुलगा आहे. तळेगाव दाभाडे येथे दीड वर्षांपासून ते राहण्यास आले. आरोपी नईम हा भंगारचा व्यवसाय करायचा.
दरम्यान, आरोपी नईम याने तारा हिचा गळा व तोंड दाबून खून केला. त्यानंतर मृतदेह एका पोत्यातून घराजवळच्या तळ्यालगत असलेल्या चारीत टाकून दिला. दोन ते तीन दिवस झाल्याने दुर्गंधी आली. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी बुधवारी (दि. २३) रात्री घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता तारा हिचा मृतदेह पोत्यात कुजलेल्या अवस्थेत आढळला. त्यानंतर पोलिसांनी घराची पाहणी केली असता नईम हा मुलांना घेऊन पळून गेल्याचे समोर आले.
खून करून केला फोन-
आरोपी नईम शेख याने तारा हिचा खून केल्यानंतर एका महिलेला फोन केला. मी माझी पत्नी तारा हिचा खून केला आहे, असे आरोपी नईम याने फोनवरून महिलेला सांगितले. मात्र आरोपी दारुच्या नशेत बोलत असावा, असे वाटल्याने फोनवरील महिलेने त्याकडे दुर्लक्ष केले.