सोनू, तुझा माझ्यावर 'भरोसा' नाय का?; नवरा-बायकोमधील वाद वाढले, मुख्य कारण मोबाईल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 04:13 PM2022-05-18T16:13:16+5:302022-05-18T16:15:54+5:30
मोबाईलवर बोलण्यावरून वाद....!
नारायण बडगुजर
पिंपरी : पती- पत्नीमधील वादाचे प्रकार वाढत असून, याबाबत पोलिसांकडे तक्रारी केल्या जात आहेत. वादाची कारणे किरकोळ असली तरी टोकाचे पाऊल उचलले जात आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या भरोसा सेलकडून अशा जोडप्यांचे समुपदेशन केले जाते. मात्र, तरीही काही पती-पत्नी ऐकून घेण्याच्या मानसिकतेत नसतात. माफी मागितल्यानंतरही लेखी लिहून दिल्याशिवाय आम्ही एकत्र येणार नाही, अशी भूमिका देखील काही जणांकडून पोलिसांकडे मांडली जाते. त्यामुळे सोनू तुझा माझ्यावर ‘भरोसा’ नाय का? असे म्हणण्याची वेळ संबंधितांवर येते.
मोबाईलवर बोलण्यावरून वाद
पती-पत्नीमध्ये मोबाईलवर बोलण्यावरून जास्त वाद होतात. तसेच सोशल मीडियाचा वापर देखील वादाला कारणीभूत ठरत आहे. जोडीदाराला वेळ देण्याऐवजी मोबाईलवर जास्त वेळ व्यस्त राहिल्याने देखील वाद होतात. तसेच कुटुंबातील इतर सदस्यांसोबत असलेले मतभेद, पाश्चिमात्य संस्कृतीची ओढ, अपमानास्पद वागणूक, सतत माहेरी जाणे, मानपान, हुंडा, पैशांची मागणी, हाॅटेलमध्ये जेवायला न नेणे, बाहेर फिरायला न नेणे, चारित्र्यावरील संशय आदी कारणांमुळे पती-पत्नीमध्ये वाद होतात.
चार महिन्यांत किती ११३ तक्रारी
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालायच्या भरोसा सेलकडे यंदा जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांच्या कालावधीत ११३ तक्रारी आल्या. या तक्रारींचा भरोसा सेलकडून निपटारा केला जातो. समजोता न झाल्यास संबंधित पोलीस ठाण्याकडे गुन्हा दाखल केला जातो. तत्पूर्वी पोलीस ठाण्याच्या पातळीवर देखील संबंधित पती-पत्नी यांच्यातील गैरसमज दूर होण्यासाठी प्रयत्न केले जातात.
पत्नीविरूद्ध १८ तक्रारी
पत्नीकडून त्रास होत असल्याच्याही तक्रारी काही पतींकडून केल्या जातात. भरोसा सेलकडे अशा १८ तक्रारी चार महिन्यांत प्राप्त झाल्या. पत्नी विविध कारणांवरून आपला छळ करते, माहेरच्यांचे ऐकून कुटुंबातील इतर सदस्यांशी भांडण करते, अशा तक्रारी पतींकडून केल्या जात आहेत.
पतीविरुद्ध ९५ तक्रारी
पती चारित्र्यावर संशय घेतो, दारू पिऊन येतो, मारहाण करतो, अशा आशयाचा विविध तक्रारी विवाहितांकडून केल्या जातात. जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात अशा ९५ तक्रारी भरोसा सेलकडे प्राप्त झाल्या. या विवाहितांची समजूत काढून त्यांच्या पतीचेही समुपदेशन केले जाते.
१३ संसाराची गाडी पुन्हा रूळावर
प्राप्त झालेल्या प्रत्येक तक्रारीची दखल घेत भरोसा सेलकडून समुपदेशन केले जाते. केवळ पती-पत्नी नव्हे तर त्यांच्या कुटुंबियांचेही समुपदेशन होते. गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातात. अशा समुपदेशनामुळे १३ संसांरांची गाडी पुन्हा रुळावर आली आहे. संबंधित पती-पत्नीमधील दुरावा मिटून त्यांचा सुखाचा संसार पुन्हा सुरू झाला आहे.
भरोसा सेलकडून ९५ प्रकरणांत समुपदेशन
भरोसा सेलकडे जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत दाखल झालेल्या तक्रारींपैकी ९५ प्रकरणांमध्ये समुपदेशन करण्यात आले. पोलीस आयुक्तालयात समुपदेशनासाठी स्वतंत्र कक्ष आहे. पोलीस तसेच तज्ज्ञांकडून तेथे समुपदेशन केले जाते.