Pimpri Chinchwad: 'मी पार्थ भाऊंचा मित्र आहे', पार्थ पवारांचे नाव सांगून तपासासाठी पोलिसांवर दबाव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 08:18 PM2022-03-29T20:18:00+5:302022-03-29T20:18:07+5:30

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचे नाव सांगून पोलीस अधिकाऱ्यावर दबाव टाकल्याचा प्रकार समोर आला आहे

I am Partha friend pressure on police for investigation by naming Partha Pawar in pimpri chinchwad | Pimpri Chinchwad: 'मी पार्थ भाऊंचा मित्र आहे', पार्थ पवारांचे नाव सांगून तपासासाठी पोलिसांवर दबाव

Pimpri Chinchwad: 'मी पार्थ भाऊंचा मित्र आहे', पार्थ पवारांचे नाव सांगून तपासासाठी पोलिसांवर दबाव

Next

पिंपरी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचे नाव सांगून पोलीस अधिकाऱ्यावर दबाव टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. गुन्ह्यात खोटी साक्ष व चुकीच्या पद्धतीने तपास करावा, यासाठी राजकीय पक्षाच्या मोठ्या पदावरील व्यक्तींच्या नावाचा वापर करून धमकी दिल्याचा हा प्रकार हिंजवडी येथे सोमवारी (दि. २८) उघडकीस आला. 

सहायक पोलीस निरीक्षक नकुल न्यामने (वय ४७) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, अश्रफ मर्चंट याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथील अमित कलाटे याच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. आरोपी मर्चंट याने २२ जानेवारीला फिर्यादी न्यामने यांना फोन केला. मी पार्थ भाऊंचा मित्र आहे, तुमच्याकडे अमित कलाटेचा विषय आहे का ? तुमचा त्या विषयात काय स्टॅन्ड आहे, मी आणि पार्थ पवार यांचे पीए सागर जगताप हे कलाटे याचे खास मित्र आहोत. तुम्हाला मी सांगतोय ते ऐका, वाटल्यास तुम्हाला मी जिजाई बंगला, भोसले नगर येथे थेट समोर घेऊन जाईन, अमितचा काय असेल तो विषय तुम्ही मिटवून घ्या, नाहीतर विषय वरपर्यंत घेऊन जावे लागेल. राष्ट्रवादीचे प्रवक्ता उमेश पाटील यांनी देखील मला तुम्हाला विचारून घ्यायला सांगितले आहे, असे बोलून आरोपी मर्चंट याने फिर्यादीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. 

याप्रकरणी तांत्रिक बाबीची पूर्तता करून फिर्यादी न्यामने यांनी सोमवारी (दि. २८) तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. दाखल गुन्ह्यातील तपासामध्ये खोटी साक्ष व चुकीच्या पद्धतीने तपास करावा, यासाठी राजकीय पक्षाच्या मोठ्या पदावरील नावाचा वापर करून आरोपीने फिर्यादी न्यामने यांच्यावर दबाव टाकला, असे फिर्यादीत नमूद आहे. सहायक पोलीस निरीक्षक सागर काटे तपास करीत आहेत.

Web Title: I am Partha friend pressure on police for investigation by naming Partha Pawar in pimpri chinchwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.