'मी आकुर्डीचा भाई, मला फुकट दारू द्या' असे म्हणत दुकानदाराला जीवे मारण्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2021 04:02 PM2021-11-02T16:02:16+5:302021-11-02T16:03:12+5:30
जबरदस्तीने ३२० रुपये किंमतीच्या दोन दारूच्या बाटल्या आरोपी घेऊन गेला
पिंपरी : मी आकुर्डीचा भाई आहे. तुम्ही मला फुकट दारू द्या, असे म्हणत एकाने पैसे न देता दारूच्या दोन बाटल्या घेतल्या. त्यानंतर दुकानदाराला शिवीगाळ व दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. जुना पुणे मुंबई महामार्ग, आकुर्डी येथे सोमवारी (दि. १) सकाळी अकराच्या सुमारास स्वरूप वाईन्स या दुकानात ही घटना घडली.
विजय वाघमारे (रा. आकुर्डी), असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी आदिनाथ हनुमंत गोरे (वय २५, रा. तळवडे) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरे यांचे आकुर्डी येथे स्वरूप वाइन्स नावाचे दुकान आहे. सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास विजय वाघमारे हा गोरे यांच्या दुकानात आला. मी आकुर्डीचा भाई आहे. तुम्ही मला फुकट दारू द्या, असे म्हणून दुकानातील दोन दारुच्या बाटल्या वाघमारेने घेतल्या. गोरे यांनी विरोध केला असता आरोपीने त्यांना शिवीगाळ व दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली. दुकानातील कामगार हा वाद सोडवण्यासाठी आले असता त्यांनाही शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर जबरदस्तीने ३२० रुपये किंमतीच्या दोन दारूच्या बाटल्या आरोपी घेऊन गेला.