मी नको म्हणत होतो, तिनं ऐकलं नाही अन्...; अभयकुमार मिश्रा यांनी मांडली व्यथा
By नारायण बडगुजर | Published: December 8, 2023 11:57 PM2023-12-08T23:57:09+5:302023-12-08T23:58:07+5:30
तळवडे येथील फटाक्याच्या कारखान्यात महिला मजूर होत्या. कमी पैशांत मजुरीसाठी तयार होतात म्हणून महिलांना या कारखान्यात प्राधान्य होते.
पिंपरी : ‘‘मी नको म्हणून सांगत होतो. मात्र, तिनं ऐकलं नाही, ती कामाला गेली. मी तिला सकाळी कामावर सोडलं आणि होत्याचं नव्हतं झालं’’, असे सांगताना अभयकुमार मिश्रा यांना दाटून आले होते.
तळवडे येथील फटाक्याच्या कारखान्यात महिला मजूर होत्या. कमी पैशांत मजुरीसाठी तयार होतात म्हणून महिलांना या कारखान्यात प्राधान्य होते. अभयकुमार मिश्रा यांच्या पत्नी पूनम (वय ३७) यादेखील येथे कामाला होत्या. उत्तर प्रदेश येथील देवरिया या गावाचे असलेले मिश्रा दाम्पत्य काही वर्षांपूर्वी रोजगाराच्या शोधात पिंपरी-चिंचवड शहरात आले. तळवडे येथील गणेशनगर भागात भाडेतत्त्वावर मिश्रा दाम्पत्य राहत आहे. १४ वर्षीय मुलगी आणि १२ वर्षीय मुलगा अशी अपत्ये असलेल्या मिश्रा यांचा संसार सुखात सुरू होता. अभयकुमार हे आंबेठाण येथे फॅब्रिकेशन शाॅपमध्ये कामाला आहेत.
घरखर्चाला मदत व्हावी म्हणून गेल्या चार महिन्यांपासून पूनम मिश्रा फटाक्याच्या कारखान्यात कामाला जात होत्या. सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत त्या कामावर असायच्या. त्यासाठी त्यांना दरदिवसाला २८० रुपये मजुरी मिळायची. ती कमी असल्याने पती अभयकुमार त्यांना कामावर पाठवण्यास तयार नव्हते. मात्र, इतर महिला जातात. मीही जाते, असा आग्रह करून पूनम यांनी कारखान्यात काम सुरू केले होते. अभयकुमार दररोज त्यांना कामावर सोडून जात होते.
मिश्रा दाम्पत्याची शुक्रवारची दिनचर्या नेहमीप्रमाणे सुरू झाली. पूनम यांनी त्यांच्यासाठी तसेच पती अभय यांच्यासाठी जेवणाचे डबे भरले. मुलगी आणि मुलगा शाळेत गेले. त्यानंतर अभय हे पूनम यांना फटाक्याच्या कारखान्यात सोडून आंबेठाण येथे त्यांच्या कामाच्या ठिकाणी गेले. त्यानंतर दुपारी सव्वातीनच्या सुमारास त्यांच्या घराशेजारच्या व्यक्तीचा फोन आला. पूनम कुठे कामाला आहे, असे त्यांनी विचारले. फटाका कारखान्यात कामाला असल्याचे त्यांनी सांगितले. कारखान्यात आग लागल्याचे शेजारच्या व्यक्तीने फोनवरून संगितले. त्यानंतर अभयकुमार अस्वस्थ झाले. नेमके काय झाले असेल, असा विचार करत ते आंबेठाण येथून तळवडे येथे पोहचले. तेथून वायसीएम रुग्णालयात गेले.
कोळसा पाहून काळजाचा थरकाप उडाला... -
अभय कुमार वायसीएम रुग्णालयात पोहोचले. तेथे मृतांमध्ये त्यांच्या पत्नीची ओळख करून देण्यासाठी नेण्यात आले. मात्र, सर्वच मृतदेहांचा अक्षरश: कोळसा झाल्याचे त्यांनी पाहिले आणि त्यांच्या काळजात चर्र झाले. त्यांचा थरकाप उडाला. या मृतांमध्ये पत्नीचा मृतदेह कोणता, असा प्रश्न त्यांना पडला. त्यांच्या दोन भावांनी त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला.
आपल्याला पैशांची आवश्यकता नाही. कामाला जाऊ नकोस, असे मी पूनमला सांगत होतो. मात्र, तिचा आग्रह कायम होता. या दुर्घटनेने होत्याचे नव्हते झाले.
- अभय कुमार मिश्रा, गणेशनगर, तळवडे