रिंगरोडसाठी माळरान जागेचा विचार
By Admin | Published: June 27, 2017 07:18 AM2017-06-27T07:18:50+5:302017-06-27T07:18:50+5:30
प्रस्तावित रिंगरोडसाठी जास्तीत जास्त माळरानावरील जमिनीचा विचार करण्याचे आश्वासन पुणे क्षेत्र प्रादेशिक विकास
लोकमत न्यूज नेटवर्क
वडगाव मावळ : प्रस्तावित रिंगरोडसाठी जास्तीत जास्त माळरानावरील जमिनीचा विचार करण्याचे आश्वासन पुणे क्षेत्र प्रादेशिक विकास प्राधिकरणचे (पीएमआरडीए) मुख्य कार्यकारी अधिकारी किरण गित्ते यांनी शेतकरी प्रतिनिधींच्या बैठकीत दिले.
मावळ, मुळशी, खेड, हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रतिनिधी गटांसमवेत मुख्य कार्यकारी अधिकारी गित्ते यांच्यासह आमदार संजय भेगडे यांची पुणे येथील पीएमआरडीए कार्यालयात बैठक झाली. यामध्ये शेतकऱ्यांनी आपले प्रश्न मांडले. बागायती जमिनीमधून रिंगरोड जाऊ देणार नाही. प्रस्तावित रिंगरोडची असणारी बाधित बांधकामे पाडू देणार नाही. ज्या ठिकाणी शेतकरी पूर्णपणे भूमिहीन होत आहे, त्याचे पुनर्वसन व मूलभूत नागरी सुविधा देण्यात यावी, आदी मागण्या शेतकरी प्रतिनिधींनी केल्या. रिंगरोडसाठी बागायती जमिनी वगळून माळरानावरील जमिनीचा विचार करावा. भूमिहीन होणाऱ्या शेतकऱ्याचे पुनर्वसन करावे. सद्य:स्थितीत अस्तित्वातील असणारा रस्त्याचा वापर रिंगरोडसाठी करावा. कमीत कमी दंड आकारून व दंडामध्ये सवलत देऊन बाधित अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यात यावी. पीएमआरडीए स्थापन होण्यापूर्वी जी बांधकामे झालेली आहेत व स्थापन झाल्यानंतरच्या बांधकामासाठी जो दंड लावला जात आहे त्याचा शासनाकडून पुन्हा विचार करून दंडाची रक्कम कमी करण्यात यावी, अशी मागणी आमदार भेगडे यांनी केली. रिंगरोडसाठी जास्तीत जास्त माळरानाचा विचार करू आणि प्रमुख ठिकाणी रस्त्याच्या कडेला जागा विकसित करून ती जागा शेतकऱ्यांना देऊ आणि त्या ठिकाणी चार एफएसआय व नागरी मूलभूत सुविधा देऊ. बांधकामाबाबत योग्य तो निर्णय घेऊ असे मुख्य कार्यकारी अधिकारी गित्ते यांनी सांगितले.
बैठकीसाठी तहसीलदार रणजीत देसाई, मावळ पंचायत समितीचे सभापती गुलाबराव म्हाळसकर, उपसभापती शांताराम कदम,भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष शंकरराव शेलार, वंदे मातरम संघटनेचे जनार्दन पायगुडे, माजी सभापती एकनाथ टिळे, प्रशांत ढोरे, सूर्यकांत सोरटे, किरण राक्षे, शांताराम भोते, रमेश राक्षे, दिंगबर जाधव, पोपट राक्षे, वसंत राक्षे, सचिन गराडे, अनिल जाधव,नामदेव आमले, कांतीलाल सोरटे आणि मावळ, मुळशी, खेड, हवेलीतील शेतकऱ्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.