आयडिया नेटवर्क ‘नॉट रिचेबल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 04:23 AM2017-07-21T04:23:35+5:302017-07-21T04:23:35+5:30
आयडिया मोबाइल नेटवर्कमध्ये वारंवार व्यत्यय येत असल्याने पिंपरी-चिंचवडमधील ग्राहक त्रस्त झाले आहेत. वेळोवेळी नेटवर्क खंडित होत असल्याने ग्राहक पर्यायी सेवेचा
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : आयडिया मोबाइल नेटवर्कमध्ये वारंवार व्यत्यय येत असल्याने पिंपरी-चिंचवडमधील ग्राहक त्रस्त झाले आहेत. वेळोवेळी नेटवर्क खंडित होत असल्याने ग्राहक पर्यायी सेवेचा विचार करू लागले आहेत.
मोबाइल टॉकटाईम असो की, इंटरनेट सेवा; दोन्हीमध्ये ग्राहकांना योग्य प्रकारे सेवा मिळत नसल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. काही कंपन्या, संस्था यांनी ग्रुप योजनेच्या लाभासाठी आयडियाच्या सेवेचा पर्याय स्वीकारला आहे. अशा संस्था, कंपन्यांच्या प्रतिनिधींना त्यांच्या ग्रुपमध्येही संवाद साधण्यात अडचणी येऊ लागल्या आहेत. ज्या उद्देशाने त्यांनी ग्रुप कनेक्शन योजनेला पसंती दिली, त्या उद्देशालाच हरताळ फासला जात आहे.
मोबाइल कंपन्यांमध्ये कमी शुल्कात अधिकाधिक सेवा देण्याची स्पर्धा लागली आहे. मोबाइल ही काळाची गरज बनली आहे. अनेक कामे मोबाइलवर केली जातात. व्यावसायिक, शासकीय सेवेतील अधिकाऱ्यांनासुद्धा मोबाइलवर त्यांची कार्यालयीन कामे करण्याची सवय लागली आहे. मोबाइल सेवेवर अवलंबून असलेल्यांना आयडियाच्या सेवेत वेळोवेळी येणारा व्यत्यय त्रासदायक ठरू लागला आहे. त्यांच्या सेवेबद्दल ग्राहक असमाधानी आहेत. सेवेत काही कारणास्तव व्यत्यय येत असेल तर त्याबद्दल ग्राहकांना नोटिफिकेशनही दिले जात नाही. ग्राहकांनी संपर्क साधल्यास त्यांना समाधानकारक उत्तर मिळत नाही. त्यामुळे ग्राहकांमध्ये आणखी नाराजी पसरली आहे. आयडिया कंपनीने त्रुटी दूर करावी, अशी अपेक्षा ग्राहकांनी व्यक्त केली आहे.
दिवसभरात दर पंधरा ते अर्धा तासला नेटवर्क खंडित होते. कोणाशी संवाद साधता येत नाही. अन्य कोणी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास ‘नॉट रिचेबल’ असे उत्तर त्यांना मिळते. यंत्रणा कोलमडू लागल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. संवाद साधता येत नाही, तर इंटरनेट सेवेवर अवलंबून असणाऱ्या ई मेल, सोशल मीडियावरील माहिती उपलब्ध होणे ही तर दूरची बाब मानली जात आहे.