‘संतभूमी’ ओळख राहावी कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2015 04:29 AM2015-09-07T04:29:20+5:302015-09-07T04:29:20+5:30
राजकारणात गुन्हेगारीचा शिरकाव झाला असून, त्याला राजाश्रय मिळाला आहे. महापालिकेत, तसेच शहरातील सहकारी संस्थांमध्ये विश्वस्त म्हणवून घेणारेच
पिंपरी : राजकारणात गुन्हेगारीचा शिरकाव झाला असून, त्याला राजाश्रय मिळाला आहे. महापालिकेत, तसेच शहरातील सहकारी संस्थांमध्ये विश्वस्त म्हणवून घेणारेच जर गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असतील, तर जनतेच्या प्रश्नांबद्दल, विकासाबद्दल त्यांना तळमळ असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
संत ज्ञानेश्वरमहाराजांचे संजीवन समाधिस्थळ आळंदी, जगद्गुरू संत तुकोबाराय यांची जन्मभूमी श्रीक्षेत्र देहू तसेच, महान गणेशभक्त मोरया गोसावी यांचे संजीवन समाधिस्थळ चिंचवड, अशा संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत गुन्हेगारीचे होणारे उदात्तीकरण वेळीच रोखले पाहिजे. संतभूमीची आणि श्रमिकांच्या कष्टाने विकसित झालेल्या या उद्योगनरीची ओळख पुसली जाऊ नये, याची दक्षता घेतली गेली पाहिजे.
अल्पावधीत झपाट्याने झालेल्या औद्योगिकीकरणामुळे शहराचा विकास झाला. कष्टकरी, श्रमिकांची ही नगरी औद्योगिकनगरी म्हणून ओळखली जाऊ लागली. पोटाची खळगी भरण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले नागरिक या ठिकाणी एकरूप झाले. विविध जाती-धर्म-पंथांचे नागरिक येथे गुण्यागोविंदाने राहत आहेत. देशाच्या आणि जगाच्या नकाशावर स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या या औद्योगिकनगरीला गुन्हेगारीचे ग्रहण लागले आहे.
केवळ राजकारणातच नाही, तर औद्योगिकक्षेत्रातही गुन्हेगारीने शिरकाव केला आहे. संघटित, असंघटित कामगारांचे नेतृत्व करण्याचा बहाणा करून उद्योजकांकडून खंडणी वसुली करण्यासाठी औद्योगिक क्षेत्रात गुन्हेगारी टोळ्यांनी शिरकाव केला आहे. त्याची झळ कामगारांनाही सोसावी लागत आहे. कामगारांमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी त्यांच्यात वाद-विवाद होऊ
लागले आहेत. खून, मारामाऱ्या
अशा गंभीर घटना घडत आहेत. औद्योगिक शांततेला बाधा पोहोचू लागली आहे. संतभूमी आणि उद्योगनगरी अशी ओळख कायम जपण्याची जबाबदारी राजकीय पक्षांचे प्रमुख नेते, तसेच मतदार म्हणून हक्क बजावणारे या सुजाण नागरिक यांच्यावरच आहे.
निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले विविध पक्षांचे उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असतील, तर त्यांना टक्कर देण्यास कोणी सज्जन उमेदवार रिंगणात थांबणार नाही. थांबला, तरी साम, दाम, दंड, भेद नीती तंत्रापुढे त्याचा टिकाव लागत नाही. (समाप्त)