धनगर समाजास आरक्षण न मिळाल्यास सरकार पाडणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 01:25 AM2019-02-19T01:25:05+5:302019-02-19T01:25:25+5:30
गोपीचंद पडळकर : पिंपरीमधील मेळाव्यात भाजपाला घरचा आहेर
निगडी : २५ फेब्रुवारीच्या आत धनगर समाजाला एस.टी. प्रवर्गाचा दाखला मिळाला नाही, तर केंद्रातील व राज्यातील सरकार पाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी सकल धनगर समाज, पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर आयोजित धनगर आरक्षण जाहीर सभेत दिला.
अखेरचा लढा आरक्षण मेळाव्याचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी नागेश तित्तर होते. गोपीचंद पडळकर, उत्तमराव जानकर यांचे धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी पिवळे झेंडे बांधलेल्या मोटारसायकल रॅलीने स्वागत केले. राजमाता अहिल्याबाई व थोर पुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून सभेला सुरुवात झाली. पडळकर म्हणाले, ‘‘धनगरांच्या जिवावर राजकारण करणारे उपेक्षा करीत असून, आता आपल्याला सत्तेत भागीदारी पाहिजे. आपल्या राज्यात जनावरांची संख्या मोजली जाते, माणसांची नव्हे. जितनी जिसकी संख्या भारी उसकी उतनी मक्तेदारी या तत्त्वावर आरक्षण मिळाले पाहिजे, असे म्हणत हुजरेगिरी करू नका
लढाई लढा. राज्यात २५०
घराणी प्रस्थापित आहेत.
ती नेस्तनाबूत करायची आहेत,
असा मनोदय त्यांनी व्यक्त केला. राज्यकर्ते आमच्या हिताचे बोलले नाहीत तर त्यांच्या वाटेत काटे पेरल्याशिवाय राहणार नाहीत अशा इशारा देत तुम्ही फक्त सात दिवस द्या, महाड ते मुंबई मोर्चात मुले, बाळे कुटुंबासह जनावरे, मेंढ्या घेऊन हजर राहा, तुम्हाला एस. टी. प्रवर्गाचा दाखला मिळवून देतो, अशी ग्वाही त्यांनी दिली.
या मेळाव्याचे आयोजन कार्यक्रम सकल धनगर समाज पिंपरी चिंचवड यांच्या वतीने केले होते.
घरातील नेत्याचे छायाचित्र गर्भवती महिलेने पाहिले आणि तो नेता भ्रष्टाचारी किंवा चोर असेल तर तुमचा मुलगाही चोर आणि खोटारडा निघू शकतो, अशा शब्दात नेत्यांविषयी नाराजी व्यक्त केली. कार्यकर्त्यांनी राजकारणात प्रगल्भ व्हायचे आहे. सर्व काही राजकारणातून घडते, त्यामुळे राजकारण करा.
- गोपीचंद पडळकर