‘आमच्या नादाला लागले तर फोडू’; पालघनने वाहनांची तोडफोड, गंग्या वाघमारेच्या गँगचा राडा
By नारायण बडगुजर | Published: October 14, 2023 04:49 PM2023-10-14T16:49:39+5:302023-10-14T16:50:59+5:30
याप्रकरणी तिघांना अटक केली. गणेशनगर, थेरगाव येथे गुरुवारी (दि. ११) रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली...
पिंपरी : पालघनने वाहनांची तोडफोड केली. तसेच मारहाण व शिवीगाळ करून सराईत गुन्हेगार गंग्या आणि त्याच्या साथीदारांनी थेरगाव परिसरात दहशत निर्माण केली. याप्रकरणी तिघांना अटक केली. गणेशनगर, थेरगाव येथे गुरुवारी (दि. ११) रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली.
संदीप प्रभाकर कुलकर्णी (४०, रा. मयुरेश्वर कॉलनी, गणेशनगर, वाकड) यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. १२) वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, रोहन उर्फ गंग्या वासुदेव वाघमारे (२८), असद गोलंदाज (२०, दोघे रा, लोकमान्य कॉलनी, थेरगाव), समाधान परिहार (३१, रा. लांडेवस्ती, एमआयडीसी भोसरी) यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्यासह तीन आल्पवयीन मुलांवर देखील पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संदीप कुलकर्णी गुरुवारी रात्री घरासमोर शतपावली करीत होते. त्यावेळी तीन अल्पवयीन मुले तेथे आले. त्यांनी हातातील पालघनने (मोठा कोयता) वाहनांची तोडफोड करीत दहशत पसरवली. त्यावेळी फिर्यादी संदीप कुलकर्णी यांनी त्यांना हटकले. याचा अल्पवयीन मुलांना राग आला. त्यानंतर अल्पवयीन मुलांचे इतर साथीदार देखील तिथे आले. त्यांनी आपसात संगनमत करून फिर्यादी कुलकर्णी यांना मारहाण केली. तसेच, त्यांच्या खिशातील एक हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले.
‘‘आम्ही गंग्या भाईच्या गँगचे नंबरकारी आहोत. आमच्या नादाला लागले तर तुम्हाला असेच फोडू’’, असे म्हणत अल्पवयीन मुले आणि त्यांच्या साथीदारांनी परिसरातील नागरिकांना धमकावले. तसेच हवेमध्ये कायते फिरवून लोकांमध्ये दहशत पसरवली. तेथून दुर्गा काॅलनीकडे जाऊन त्यांनी आणखी काही वाहनांच्या काचा फोडून नुकसान केले, असे फिर्यादीत नमूद आहे.
घटनेची माहिती मिळताच वाकड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गणेश जवादवाड, गुंडा विरोधी पथकाचे सहायक निरीक्षक हरीश माने यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. अवघ्या काही तासातच संशयिताना ताब्यात घेतले.
नागरिकांमध्ये दहशत
सरईता गुन्हेगार गंग्याच्या साथीदारांनी राडा केल्यानंतर थेरगाव परिसरात दशहतीचे वातावरण होते. टोळक्याने हवेत कोयते फिरवून धमकावल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते.