सत्ताधारी भाजपाने पाणीपट्टीमध्ये तीनपट वाढ केल्याचा आरोप, दरवाढ मागे न घेतल्यास आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 02:53 AM2018-01-31T02:53:29+5:302018-01-31T02:53:44+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभेने केलेली पिण्याच्या पाण्याची दरवाढ ही तुघलकी असून, दरवाढ मागे न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा विविध राजकीय पक्षांनी दिला आहे.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभेने केलेली पिण्याच्या पाण्याची दरवाढ ही तुघलकी असून, दरवाढ मागे न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा विविध राजकीय पक्षांनी दिला आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष पाच टक्के दरवाढ सांगत असला तरी नागरिकांसाठी असणाºया पिण्याच्या पाण्यात तिपटीने वाढ केली आहे. नागरिकांवर लादलेली दरवाढ रद्द करावी, अशी मागणी होत आहे.
महानगरपालिकेच्या स्थायी समितीमध्ये आयुक्तांच्या प्रस्तावाला उपसूचना देऊन नळजोडाला मीटर असलेल्या प्रत्येक कुटुंबाला सहाहजार लिटरपर्यंत पिण्याचे पाणी मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. हा ऐतिहासिक निर्णय असून, मोफत पाणी देणारी राज्यातील
पहिली महापालिका असा दावा सत्ताधाºयांनी केला आहे. मात्र,
याची खोलवर माहिती घेतली असता, ही योजना फसवी असल्याचे दिसून येत आहे. शिवसेना, राष्टÑवादी काँग्रेसनेही याबाबत आवाज उठविला आहे.
हा विषय चर्चिला जात असतानाच पाणीपुरवठा लाभ करामध्येही दुपटीने वाढ करण्याचा प्रस्ताव आयुक्तांनी तयार केला आहे. पाणीपुरवठा लाभ करात वाढ केल्यास वार्षिक सुमारे ३० कोटी रुपयांचे उत्पन्न वाढेल, असा अंदाज आहे. अमृत योजनेंतर्गत शहरात २४ तास पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार आहे. आंद्रा आणि भामा-आसखेड धरणातून ३०० एमएलडी पाण्याचा उपसा करण्यात येणार आहे. त्यासाठी सिंचन पुनर्स्थापना खर्च २३६ कोटी तसेच पुनर्वसन खर्च ७० कोटी रुपये सरकारकडे जमा करण्यात येणार आहे.
या दोन्ही धरणातील पाणी चिखली येथील नियोजित जलशुद्धीकरण केंद्र्रापर्यंत आणण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे ५०० कोटी रुपये इतका खर्च येणार आहे. त्यामुळे महापालिकेवर भविष्यात ८०६ कोटींचा बोजा पडणार आहे. त्यासाठी लाभ करामध्ये दुपटीने वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. यावर बुधवारी होणाºया सभेत काय चर्चा होतय याकडे सर्व शहराचे लक्ष लागले आहे़ शहरातील पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत. अनेक ठिकाणी पूर्णदाबाने पाणी येत नाहीत. त्यातच पाणीपट्टीत वाढीचा घेतलेला निर्णय अयोग्य असल्याचे मत सर्वसामान्य नागरिकांतून व्यक्त होत आहेत.
भाजपाची बनवाबनवी
प्रशासनाने पाणी मीटर व मीटर रीडिंग व स्लॅब पद्धतीने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता. या मध्ये प्रति हजार लिटरला ५.५० रुपये इतका दर निश्चित केला होता़ मीटरसाठी चौदाशे नागरिकांच्या माथी मारण्यात येणार होते़ त्यावर आंदोलन केले व एका कुटुंबाला हजार लिटर आणि महिन्याला तीस हजार लिटर, अडीच रुपयाप्रमाणे दर आकारण्याचा निर्णय करून घेतला़
तेव्हापासून आजपर्यंत मासिक ३० हजार लिटर पुरवठा केला जात होता. यासाठी त्या कुटुंबाला सरासरी पंच्याहत्तर रुपये एवढे मासिक बिलयेत होते. मोफत पाणीपुरवठ्याचे पॅकेज संपणार आहे.
- मारुती भापकर, माजी नगरसेवक
सत्ताधा-यांची धूळफेक
स्थायी समितीने पाच टक्के पाणीपुरवठा दरवाढीचा प्रस्ताव मंजूर केला. त्यात नागरिकांना सहा हजार लिटरपर्यंत पिण्याचे पाणी मोफत देण्याची योजना जाहीर केली. ही योजना फसवी आहे. धूळफेक करणारी आहे. सहा हजार लिटरपर्यंत पाणी मोफत अशी घोषणा करीत असताना दरमहा प्रतिकुटुंब निश्चित केलेले शंभर रुपये पाणीपट्टीशुल्क सोयीस्कररीत्या लपविले हा भाजपाच्या पारदर्शक कारभार आहे का? सभागृहात हा विषय आल्यानंतर आमचा विरोध असणार आहे. ना खाऊंगा ना खाने दुँगा याप्रमाणे शहरवासीयांना आता ना पाणी पिणे दँुगा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
- राहुल कलाटे, गटनेते शिवसेना
मोफत पाण्याचे गाजर
विविध निविदांमध्ये टक्केवारी लाटून सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळविण्याचा प्रकार सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून सुरू आहे. पाणीपट्टीत भरमसाठ वाढ करीत असताना सहा हजार लिटर मोफत पाण्याचे गाजर सत्ताधारी दाखवित आहेत. प्रत्यक्षात होणारी वाढ ही सर्वसामान्य नागरिक आणि विविध गृहनिर्माण सोसायट्यांना न परवडणारी आहे. त्यामुळे भाजपा सूज्ञ व्यक्तीचा पक्ष आहे, असे म्हणतात. त्यामुळे सूज्ञपणाचे वाभाडे निघणार नाही. त्यामुळे पक्षाची प्रतिमा खराब होईल. नागरिकांची फसवणूक होणार नाही. याची काळजी घ्यावी. मोफत पाणी योजना नवे गाजर आहे.
- प्रशांत शितोळे, कार्याध्यक्ष राष्टÑवादी काँग्रेस
सध्या असणारे पाण्याचे दर
० ते ३० हजार लिटर-प्रतिहजार २.५० रूपये
३० हजार ते ५० हजार लिटर-प्रतिहजार ५.५० रूपये
५० हजार ते ७५ हजार लिटर-प्रतिहजार १० रूपये
७५ हजार लिटरच्या पुढे -प्रतिहजार १५ रूपये
वाणिज्यसाठी- प्रतिहजार ३५ रूपये
प्रस्तावित दर
० ते ६ हजार लिटर- बील नाही
६ ते १५ हजार लिटर-प्रतिहजार ८ रूपये
१५ ते २२ हजार पाचशे लिटर-प्रतिहजार १५ रूपये
२२.५०० ते ३० हजार लिटर-प्रतिहजार २५ रूपये
३० हजार लिटरच्या पुढे -प्रतिहजार ३५ रूपये
वाणीज्य वापरासाठी ५० रूपये प्रति हजार लिटर