Pimpri Chinchwad: ...तर पिंपरी-चिंचवडमध्ये पाणीकपातीचे संकट अटळ; पवना धरणात ३० टक्के पाणीसाठा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 07:58 PM2023-07-14T19:58:28+5:302023-07-14T20:00:37+5:30
...शहरावर पाणीकपातीचे संकट अटळ असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे
पिंपरी : पवना धरण क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे धरणात शुक्रवारपर्यंत (दि. १४) उपयुक्त पाणीसाठा ३०.७५ टक्के होता. तो शंभर टक्के होण्यासाठी पावसाची आवश्यकता आहे. धरणातील जुलैअखेरपर्यंतचा पाणीसाठा विचारात घेऊन पिंपरी-चिंचवडच्या पाणीपुरवठ्याचा विचार केला जातो. त्यानुसार उन्हाळ्यात व पावसाळ्याच्या सुरुवातीच्या दिवसांत विसर्गाचे प्रमाण ठरविले जाते. जर आवश्यक पाऊस नाही झाला तर शहरावर पाणीकपातीचे संकट अटळ असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
पवना धरणातून दररोज ५१० दशलक्ष लिटर (एमएलडी) अशुद्ध जलउपसा केला जातो. धरणापासून नदी पात्रातून आलेले पाणी रावेत येथील बंधाऱ्यातून उचलले जाते. तेथून पाणी जलवाहिन्यांद्वारे निगडी-प्राधिकरण सेक्टर २३ मधील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी नेले जाते. त्यावर प्रक्रिया करून शहराला पाणीपुरवठा होतो. सध्या २५ नोव्हेंबर २०१९ पासून शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. समान प्रमाणात सर्वांना पुरेसे पाणी मिळावे, यासाठी प्रशासनाने दोन भागात विभाजन केले आहे. त्यामुळे एकाच दिवशी संपूर्ण शहराला ५१० एमएलडी पाणीपुरवठा करण्याऐवजी निम्मे शहरालाच तेवढे पाणी दिले जात आहे. त्यामुळे शिवाय, एमआयडीसीकडून दररोज ३० एमएलडी पाणी घेतले जात आहे. तसेच, आंद्रा धरणातून दररोज ५० एमएलडी पाणी शहराला मिळत आहे.
पाणीकपातीची आहे भीती...
जून महिन्यात पावसाने ओढ दिली होती. पहिल्या आठवड्यात अपेक्षित असणारा पाऊस जूनच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झाला. तेव्हापासून मावळातही दररोज पाऊस सुरू आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्याचे प्रमाण काहीसे अधिक असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. पावसाने आणखी ओढ दिली तर, एक ऑगस्टपासून आणखी पाणी कपातीचे नियोजन करावे लागेल, अशी माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली.
आंद्रात ४३.२३ टक्के साठा
आंद्रा धरणातून १०० एमएलडी आणि भामा-आसखेड धरणातून १६७ एमएलडी पाणीकोटा शहरासाठी मंजूर आहे. त्याअंतर्गत चिखली येथे ३०० एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र महापालिकेने उभारले आहे. सद्यस्थितीत भामा-आसखेड धरणातून पाणी आणण्यासाठी जलवाहिनी, जॅकवेल आदी कामे सुरू आहेत. आंद्रा धरणातून विसर्ग केलेले पाणी इंद्रायणी नदीतून शहरापर्यंत पोहोचणार आहे. त्यासाठी निघोजे येथील बंधाऱ्यातून दररोज ५० एमएलडी पाणी घेतले जात आहे. चिखली जलशुद्धीकरण प्रकल्पातून पुरवठा सुरू आहे.