आधार असल्यास साक्षीदारांची गरज नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 03:26 AM2018-04-04T03:26:35+5:302018-04-04T03:26:35+5:30
नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या माध्यमातून घर व जमीन खरेदी-विक्री व्यवहार करणाऱ्या खरेदीदार व विक्रेत्याकडे आधारकार्ड असल्यास आता साक्षीदाराची गरज भासणार नाही. मुद्रांक शुल्क विभागाकडून लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे.
पुणे - नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या माध्यमातून घर व जमीन खरेदी-विक्री व्यवहार करणाऱ्या खरेदीदार व विक्रेत्याकडे आधारकार्ड असल्यास आता साक्षीदाराची गरज भासणार नाही. मुद्रांक शुल्क विभागाकडून लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे.
नोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालयात दस्तनोंदणी करणाºयांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. नोंदणी व मुद्रांक विभागाकडे राज्यातील दुसºया क्रमांकाचे महसूल देणारा विभाग म्हणून पाहिले जाते. त्यामुळे नागरिकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागातर्फे केला जात आहे.
सध्यस्थितीत मालमत्ता खरेदी-विक्री करताना दुय्यम उपनिबंधकासमोर साक्षीदाराची कागदोपत्री संपूर्ण माहिती घेणे, त्यांच्या अंगठ्याचे ठसे, फोटो, हमीपत्र, स्वाक्षरी अशी प्रक्रिया पूर्ण करावी लागते. साक्षीदार नसल्यास खरेदी-विक्री व्यवहार करणे शक्य होत नाही. त्यामुळे साक्षीदार हा या प्रक्रियेमधील सर्वांत महत्त्वाचा दुवा मानला जातो. परंतु, केंद्र शासनाने प्रत्येक विभागात आधारकार्ड अनिवार्य केल्याने संबंधित व्यक्तीची पडताळणी व प्रमाणीकरण करणे सोपे झाले आहे.
त्यामुळे आधारकार्ड असलेल्या साक्षीदाराची आवश्यकता असू नये, या मुद्रांक शुल्क विभागाने राज्य शासनाकडे पाठविलेल्या प्रस्तावास मान्यता मिळाली आहे. परिणामी नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाच्या कामकाजात सहजता येणार आहे.
केंद्र शासनाने सर्व शासकीय कामकाजातील कागदोपत्री व्यवहारात आधार क्रमांक अनिवार्य केला आहे. त्याचप्रमाणे विविध विभागांच्या सेवांसंदर्भात आधार क्रमांक जोडणी अनिवार्य केली आहे. परिणामी मूळ व्यक्तीची सत्यता पडताळणे सोपे झाले आहे. त्यामुळे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने ही यंत्रणा कार्यान्वित करून नागरिकांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे.
- सुप्रिया करमरकर-दातार,
उपमहानिरीक्षक, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग