येता कण कण तापाची, तपासणी करा रक्ताची; पावसाळ्यात डेंग्यू, चिकुनगुनियाचा धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 12:06 PM2023-06-30T12:06:09+5:302023-06-30T12:06:22+5:30
ताप, सर्दी, थंडी, खोकला व अंगदुखी अशी लक्षणे आढळल्यास रुग्णालय किंवा जवळच्या दवाखान्यामध्ये तपासणी करून घ्यावी
पिंपरी : शहरामध्ये पावसाला सुरूवात झाली असून, यासोबतच साथीच्या आजारांनाही निमंत्रण मिळते. पावसाळ्यामध्ये डेंग्यू, चिकुनगुनियासह थंडी-तापाची साथ येते. त्यामुळे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने साथीच्या आजारांना रोखण्यासाठी तयारी केली आहे. तसेच महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये गोळ्या व औषधांचा पुरेसा साठा असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
गेल्या एक आठवड्यापासून शहरामध्ये पावसाला सुरुवात झाली. शहरातील अनेक भागांमध्ये साचलेल्या पाण्यात डासांच्या अळ्या वाढतात. मात्र, त्याकडे विशेष लक्ष न दिल्याने डासांची उत्पत्ती विनासायास होते. दरम्यान, शहरात साथीचे आजार पसरू नयेत, यासाठी काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय विभागाने केले आहे. कीटकजन्य आजार पसरू नयेत, याची काळजी घ्यावी. आपल्या घरातील पाण्याचे काही साठे पूर्णपणे रिकामे करता येणे शक्य नसते. घरावर असलेली पाण्याची टाकी किंवा तळघरात साचलेले पाणी अशा ठिकाणी डासांनी अंडीच घालू नयेत. म्हणून या टाक्या पूर्णपणे झाकण टाकून बंद ठेवाव्यात. म्हणजे डास टाकीत शिरणार नाहीत. आपल्या घरामध्ये आपल्याकडून दुर्लक्षित असणारे साचलेले पाणी फ्लॉवर पॉट, कुलर, मनीप्लॅन्ट, घरातील छोटे शोभेचे कारंजे, फ्रिजचा खालचा ट्रे अशा ठिकाणी असते. दर आठवड्यात या वस्तूतील पाणी बदलले गेले नाही तर डासांना अंडी घालण्यास उत्तम जागा मिळते. त्यामुळे त्याची स्वच्छता करावी, असे आवाहन वैद्यकीय विभागाने केले आहे.
लक्षणे दिसल्यास तत्काळ भेटा डॉक्टरांना
दरम्यान, डेंग्यू, चिकुनगुनिया यांसारखे आजार पावसाळ्यामध्ये होतात. तसेच वातावरणामध्ये अचानक बदल झाल्याने त्याचा परिणाम माणसांच्या आरोग्यावर होतो. अशावेळी ताप, सर्दी, थंडी, खोकला व अंगदुखी होते. त्यामुळे अशी लक्षणे आढळल्यास तत्काळ महापालिकेचे रुग्णालय किंवा जवळच्या दवाखान्यामध्ये तपासणी करून घ्यावी. तसेच रक्ताची चाचणी करून उपचार करावेत, असे आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे.
आरोग्य विभागाला कंटेनर सर्वेक्षण करण्याची सूचना
महापालिकेची आठ रुग्णालये व मनपा दवाखान्यामध्ये साथीच्या आजारांवर उपचार केले जातात. त्यासाठी वैद्यकीय विभागाने तयारी केली आहे. गोळ्या, औषधांचा साठा आहे. तसेच रुग्णालये सज्ज आहेत. आरोग्य विभागाला कंटेनर सर्वेक्षण करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार कंटेनर सर्वेक्षण करण्यास सुरुवात झाली आहे. - डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी.