‘पोलिसांत तक्रार केली तर तुझा मर्डर करीन’, दारुसाठी तरुणावर कोयत्याने वार
By नारायण बडगुजर | Published: December 24, 2023 04:50 PM2023-12-24T16:50:33+5:302023-12-24T16:51:05+5:30
चिंचवड येथील लिंकरस्त्यावरील पत्राशेड समोरील मोकळ्या जागेत ही घटना घडली
पिंपरी : दारुला पैसे दे, असे म्हणून चौघांनी मिळून तरुणाच्या डोक्यात कोयता मारून गंभीर जखमी केले. तसेच लोकांमध्ये दहशत पसरवली. तू पोलिसांत तक्रार केली तर तुझा मर्डर करीन, अशी धमकीही दिली. चिंचवड येथील लिंकरस्त्यावरील पत्राशेड समोरील मोकळ्या जागेत शुक्रवारी (दि. २२) रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली.
प्रमोद वामन ओगले (२७, रा. लिंक रस्ता, पत्रा शेड झोपडपट्टी, चिंचवड) यांनी याप्रकरणी शनिवारी (दि. २३) चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. अमन शेख, आकाश मोरे, आकाश राजू कांबळे, अतुल भोसले (सर्व रा. पत्राशेड, लिंक रस्ता, चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रमोद ओगले हे राहत्या घरी जात होते. त्यावेळी संशयित आकाश कांबळे याने ‘‘दारुला पैसे दे,’’ असे म्हणून प्रमोद यांना लाथाबुक्क्याने मारहाण केली. अमन शेख याने फिर्यादी प्रमोद यांच्या डेक्यात कोयता मारून गंभीर जखमी केले. आकाश कांबळे याने स्टीलचा पाईप डोक्यात मारून प्रमोद यांना जखमी केले. त्यावेळी फिर्यादी प्रमोद मदतीसाठी मोठमोठ्याने आरडाओरडा केल्याने पत्राशेडमधील लोक बाहेर आले. त्यावेळी अमन शेख याने त्याच्या हातातील कोयता हवेत फिरवून दहशत निर्माण केली. ‘‘कोणी पण इथे येऊ नका, जो कोणी याला मदत करील एकाएकाला मी मारीन, मी अगोदर खूप लोकांना मरले आहे, खूप गुन्हे केले आहे. मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. मी इथला भाई होणार आहे. पूर्ण पिंपरी मला भाई म्हणून ओळखते. माझे कोणी काही वाकडे करू शकत नाही,’’ असे म्हणून अमन शेख याने लोकांमध्ये दहशत पसरविली. त्यामुळे लोक घाबरून घरात जाऊन दरवाजे खिडक्या बंद करून बसले. ‘‘तू जर माझी पोलिसांत तक्रार केली तर मी सुटल्यावर तुझा मर्डर करीन,’’ असे म्हणून अमन शेख याने फिर्यादी प्रमोद यांना धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे. पोलिस उपनिरीक्षक नीलेश चव्हाण तपास करीत आहेत.