पोलिसाला बघून पळ काढाल तर सावधान!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 02:23 PM2022-12-26T14:23:08+5:302022-12-26T14:23:21+5:30
आता वाहनचालकांना दंडात्मक कारवाईसोबत जेलची हवासुद्धा खावी लागू शकते
पिंपरी : वाहतुकीचे नियमन करण्यासाठी वाहतूक पोलिस चौकात उभे असतात. अशा वेळी अनेक जण झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे आपले वाहन उभे करून थांबलेले असतात. सिग्नल सुटल्यानंतर वाहतूक पोलिस अशा वाहनचालकांना थांबण्यासाठी इशारा करतात. मात्र, अनेक जण या इशाऱ्याकडे बघूनदेखील वाहन वेगाने चालवून पळ काढतात. वाहतूक पोलिसांना बघून असा पळ काढणे महागात पडेल, कारण आता वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईसोबत जेलची हवासुद्धा खावी लागू शकते.
दीड हजाराचा दंड
वाहतूक पोलिसांनी थांबण्यास सांगूनही वाहनचालकाने पळ काढला तर त्या वाहनचालकावर दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकार वाहतूक पोलिसांना आहे. पळ काढणारे वाहनचालक चौकातील सीसीटीव्हीमध्ये कैद होत असतात. या वाहनचालकांवर वाहतूक पोलिस ५०० रुपये दंड आकारू शकतात. तर, हाच अपराध परत केला तर दीड हजार रुपये दंड वाहनचालकाला भरावा लागेल.
सरकारी कामात अडथळा आणाल तर...
अनेकदा वाहतूक पोलिस वाहनचालकाला अडवत असताना ते वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की करतात. अशा बेशिस्त वाहनचालकावर सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. फक्त गुन्हाच नाही तर अशा बेशिस्त वाहनचालकाला जेलची हवासुद्धा खावी लागू शकते.
बेसावध राहू नका
चौकात वाहतूक पोलिस उभे नाहीत, या संधीचा फायदा घेत अनेक दुचाकीचालक, कारचालक आपली गाडी सिग्नल लागला असतानाही न थांबता निघून जातात. आपल्याला कोणी पाहिलेच नाही, असा त्यांचा होरा असतो. मात्र, वाहतूक पोलिस जरी चौकात नसले तरी चौकात असलेल्या सीसीटीव्हीद्वारे तुमच्यावर लक्ष ठेवण्यात येत आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन केल्यास ईचलनाद्वारे ऑनलाइन पद्धतीने दंड आकारण्यात येत आहे.