Pimpri Chinchwad: ‘दांडिया’त छेड काढाल तर पोलिस कोठडीत जाल, टवाळखोरांसाठी पोलिसांची पथके
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 01:56 PM2023-10-16T13:56:12+5:302023-10-16T13:56:47+5:30
पिंपरी-चिंचवड पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. छेड काढणाऱ्याला थेट पोलिस कोठडीत पाठविण्यात येणार आहे.....
पिंपरी : नवरात्रोत्सवास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. त्यानिमित्त शहरात विविध मंडळांकडून दांडियाचे आयोजन केले आहे. यात मोठ्या प्रमाणात तरुण-तरुणी सहभाग घेतात. मात्र, या गर्दीत काही टवाळखोर हे मुलींची छेड काढण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. छेड काढणाऱ्याला थेट पोलिस कोठडीत पाठविण्यात येणार आहे.
गर्दीत चोरी
शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये तसेच गर्दीच्या ठिकाणी मोबाइल चोरी होत आहे. यासह सण-उत्सव काळात मोबाइल चोरीचे प्रकार वाढतात.
मोबाइल, दागिने सांभाळा
- गर्दीत जाताना मोबाइल सुरक्षित राहील याची खबरदारी घ्यावी. गर्दीत मोबाइल घेऊन जाणे टाळावे, असे आवाहन पोलिसांनी केले.
- महिला व मुली दांडियासाठी दागिने घालून जातात. दागिन्यांवर चोरटे नजर ठेवून असतात. दागिने चोरीला जाणार नाहीत, याबाबत खबरदारी घ्यावी.
टवाळखोरांना रोखण्यासाठी पोलिसांची पथके
नवरात्रोत्सवात गरबा, दांडियाचे आयोजन केलेल्या ठिकाणी पोलिसांचा वाॅच राहणार आहे. चोरी, गुन्हेगारी कृत्य टाळण्यासाठी तसेच टवाळखोरांना रोखण्यासाठी पोलिसांची विविध पथके नियुक्त केली आहेत. गुन्हे शाखेचे तसेच स्थानिक पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. साध्या वेशातील पोलिस गर्दीत सहभागी होऊन चोरट्यांवर नजर ठेवून आहेत.