‘अज्ञाना’वरून खडाजंगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 12:56 AM2018-09-01T00:56:46+5:302018-09-01T00:57:05+5:30
स्मार्ट सिटी बैठक : विरोधी पक्षनेते अन् आयुक्तांमध्ये जुंपली
पिंपरी : स्मार्ट सिटी योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवरांची सल्लागार समिती निर्माण केली आहे. स्मार्ट सिटीची पहिली बैठक महापालिका भवनातील आयुक्त दालनात झाली. त्या वेळी ‘अज्ञान’ या शब्दावरून आयुक्त श्रावण हर्डीकर आणि विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या खडाजंगी झाली. त्यानंतर विरोधी पक्षनेते बैठकीतून निघून गेले.
महापालिकेतील तिसऱ्या मजल्यावरील आयुक्त दालनात स्मार्ट सिटीसाठी निर्माण केलेल्या विविध संस्थांच्या सल्लागार समितीची पहिलीच बैठक झाली. त्यात स्मार्ट सिटीबाबत सादरीकरण करण्यात आले. शहर वायफाय करणे आणि नेटवर्किंग विषयाची माहिती दिली.
या विषयाची माहिती प्रशासनाच्या वतीने दिली. केंद्र सरकारच्या मदतीने सौर ऊर्जेचा वापर वाढविणे याबाबत माहिती देण्यात आली. शहरातील दोन ठिकाणी असणाºया महापालिका इमारतींवर महापालिकेच्या खर्चाशिवाय सोलर पॅनल बसविण्यात येणार आहेत. त्यातून मिळणारी वीज महापालिकेस वापरण्यात मिळणार आहे. साडेतीन रुपये प्रती युनिट दराने मिळणार आहे, असे सांगितले. त्यावर विरोधी पक्षनेते दत्ता साने म्हणाले, ‘‘महापालिकेच्या वतीने वेस्ट टू एनर्जी या प्रकल्पातून मिळणारी वीज आपण साडेपाच रुपये दराने खरेदी करणार आहोत आणि दुसºया ठिकाणी सोलरमधून मिळालेली साडेतीन रुपये दराने घेणार आहोत. अशी तफावत का?’’ त्यावर आयुक्त म्हणाले, की दोन वेगवेगळे विषय आहेत. प्रकल्प वेगवेगळे आहोत, विषय मिक्स करू नका. त्यावर विरोधी पक्षनेते म्हणाले, ‘‘विषय वीज खरेदीचाच आहे. दरात तफावत का? असा आमचा प्रश्न आहे.’’ त्यावर याविषयीचे तुमचे ‘अज्ञान’ आहे, असे आयुक्तांनी उत्तर दिले. त्यामुळे अज्ञान या शब्दावरून विरोधी पक्षनेते चिडले. ‘आमचे अज्ञान आहे. ही आपली भाषा आहे का? आपण जनतेचे सेवक आहात. आपणाकडून ही अपेक्षा नाही. आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहोत. आम्हाला पडणाºया प्रश्नांची उत्तरे मिळायलाच हवीत, असे साने म्हणाले.
शाब्दिक चकमक
काही काळ दोघांमध्ये शाब्दिक कलगी-तुरा सुरू होता. अचानक घडलेला हा प्रकार पाहून बैठकीस खासदार आणि आमदारांसह सर्वच जण अवाक् झाले. त्या वेळी असे म्हणण्याचा उद्देश नव्हता, आपण बैठक पुढे नेऊ, असा खुलासा आयुक्तांनी केला. मात्र, विरोधी पक्षनेते ऐकायला तयार नव्हते. ‘आम्हाला उत्तरे मिळणार नसतील तर बैठकीला थांबून काय फायदा, असे म्हणत चिडून ते बैठकीतून बाहेर पडले.