स्मशानभूमी स्वच्छतेकडे दुर्लक्ष
By admin | Published: May 9, 2017 03:41 AM2017-05-09T03:41:21+5:302017-05-09T03:41:21+5:30
तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत नव्याने बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीमध्ये साफसफाई करण्याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
देहूगाव : तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत नव्याने बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीमध्ये साफसफाई करण्याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. स्मशानभूमीसाठी कायमस्वरूपी सफाई कामगार, रखवालदार (सुरक्षारक्षक) नेमावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
येथे इंद्रायणी नदीच्या काठावर सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून स्मशानभूमी बांधण्यात आली आहे. सरणाच्या बेडजवळ जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या नाहीत. संरक्षक भिंतीवरील धोकादायक सळया कापलेल्या नाहीत. रंगकामही केलेले नाही. दोन महिन्यांतच शेडच्या लोखंडी पत्र्याला गंज लागण्यास सुरवात झाली आहे. अंत्यविधीसाठी आणलेला मृतदेह घाणीमध्येच ठेवावा लागतो अथवा उपलब्ध साधनांनी सफाई करून घ्यावी लागते. ग्रामपंचायतीने सफाई कर्मचारी नेमला नसल्याने स्मशानभूमीची साफसफाई होत नसल्याने अंत्यविधीचे साहित्य, कचरा कायम दिसून येतो. एखादा गावकारभारी अथवा गावातील राजकीय व्यक्तीच्या घरातील व्यक्तीचा अंत्यविधी असल्यास ग्रामपंचायतीमार्फत तातडीने साफसफाई केली जाते. या स्मशानात सर्वांनाच अंत्यविधीसाठी यावे लागत असताना हा भेदभाव का, ही स्मशानभूमी फक्त प्रतिष्ठितांसाठीच आहे काय, असा सवालही केला जात आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने याबाबत तातडीने दखल घेऊन स्मशानभूमीची नियमित साफसफाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने हा भेदभाव संपुष्टात आणून येथे कायमस्वरूपी सफाई कामगार नेमावा.
याबाबत राजाराम गोविंद काळोखे म्हणाले, की येथे कायमस्वरूपी रखवालदार व सफाई कामगारांची नेमणूक करावी अशी ग्रामस्थांची माफक अपेक्षा आहे. स्मशानभूमी ही सर्वांसाठी असून येथे भेदभाव करू नये. येथून पुढे स्मशानभूमीची नियमित स्वच्छता व्हावी.