अवैध धंद्यांचा व्हिडीओ व्हायरल; दोन पोलीस निरीक्षकांसह चार अधिकाऱ्यांची उचलबांगडी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 09:20 PM2022-07-05T21:20:55+5:302022-07-05T21:54:33+5:30
पोलीस आयुक्तालयातील इतर अधिकाऱ्यांची धाकधूक वाढली...
पिंपरी : शहर पोलीस दलातील दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि दोन पोलीस उपनिरीक्षक यांची उचलबांगडी करण्यात आली. निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे सुरू असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोमवारी (दि. ४) रात्री उशिरा पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी याबाबतचे आदेश दिले. त्यामुळे खळबळ उडाली असून पोलीस आयुक्तालयातील इतर अधिकाऱ्यांची धाकधूक वाढली आहे.
निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गणेश जवादवाड यांना नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आले आहे. पिंपरी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे यांच्याकडे निगडी पोलीस ठाण्याचा पदभार देण्यात आला आहे. जवादवाड यांचा कार्यकाळ संपला असल्याने प्रशासकीय कारणास्तव त्यांची बदली केल्याचे आदेशात नमूद आहे.
गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड यांची आरसीपी पथक येथे बदली झाली. गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांच्याकडे युनिट दोनचा पदभार दिला आहे. आळंदी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक इकबाल इस्माईल शेख, अशोक नागू गांगड या दोघांना देखील नियंत्रण कक्षाशी संलग्न केले आहे. या दोन अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्याने त्यांची बदली झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.