हद्दीच्या गोंधळाने फोफावले अवैध धंदे
By admin | Published: April 9, 2016 01:39 AM2016-04-09T01:39:51+5:302016-04-09T01:39:51+5:30
एरवी अपघातांमुळे सतत चर्चेत असणारा, तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून जाणारा तळेगाव दाभाडे-चाकण रस्ता पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने राजरोसपणे सुरू असलेल्या अवैध
तळेगाव स्टेशन : एरवी अपघातांमुळे सतत चर्चेत असणारा, तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून जाणारा तळेगाव दाभाडे-चाकण रस्ता पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने राजरोसपणे सुरू असलेल्या अवैध अर्थात गोरख धंद्यांमुळे ‘वाममार्ग’ बनला. पोलीस ठाण्यांच्या हद्दीच्या गोंधळाने येथे अवैध धंदे फोफावले आहेत.
तळेगाव, चाकण, शिक्रापूर पट्ट्यातील वाढते औद्योगिकीकरण, मुंबईकडून मराठवाड्याकडे वाढलेली वाहतूक यामुळे तळेगाव-चाकण हा राज्य मार्ग क्रमांक ५५ रहदारीने ओसंडून वाहत असतो. परंतु, शासनाने सर्वच बाबतींत हा रस्ता वाऱ्यावर सोडल्यासारखा झाला आहे. ना सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष ना पोलिसांचा वचक अशी स्थिती आहे. रस्त्याचा बहुतांश भाग हा तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो.
माळवाडी ते सुधा पुलापर्यंत एमआयडीसी पोलीस ठाण्याची हद्द असली, तरी नेमकी टोलनाक्यापासून येलवाडी बाजूचा भाग चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. फक्त महामार्ग हा एमआयडीसी ठाण्याच्या हद्दीत मोडतो. पोलीस ठाणे थेट आंबी येथे आडमार्गी असल्याने, घटनास्थळी पोलीस अधिकारी पोहोचेपर्यंत, खबऱ्यामार्फत निरोप पोहोचून कुकर्मी गायब झालेले असतात. अधूनमधून वाटमारीच्या घटना सुरूच असतात. काही उघड होतात. मात्र, काही घटना पोलिसांकडूनच दाबल्या गेल्याचे दाखले वाहनचालकांकडून मिळतात. हद्दीच्या गोंधळाचा फायदा घेत या रस्त्यावर अनेक अवैध धंदेवाल्यांनी आपले बस्तान बसवले आहे.
अवैध, तसेच बनावट दारूविक्री, गांजा, गुटखाविक्री राजरोसपणे सुरू आहे. पोलिसांच्या आशीर्वादाने वाहनांच्या बॅटऱ्या चोरणारी टोळी आणि त्या विकत घेणारे भंगारवालेदेखील माळवाडीजवळ दुकाने थाटून बसल्याचे बोलले जाते. मालवाहू गाड्यांमधून चोरी केलेला लोखंडी माल, लाकडी सामान विकत घेणारे भंगारवाल्यांचीही चलती आहे. नियम धाब्यावर बसवून रात्री अकरानंतर देखील बहुतांश हॉटेल बिनदिक्कत सुरू राहतात.
गस्तीवर आलेली पोलीस गाडी थंड पाण्याच्या बाटल्या घेऊन मार्गस्थ होताना दिसते. याचबरोबर एमआयडीसी रस्त्यावरही अशाच प्रकारचे उद्योग राजरोसपणे सुरू असल्याचे दिसते. संबंधित पोलिसांकडे वारंवार तक्रार करूनही कोणी दखल घेत नसल्याने, आता पोलीस अधीक्षकांनी बाहेरील पथक पाठवून शहानिशा करून या अवैध धंद्यांवर कारवाई करावी, अशी परिसरातील रहिवाशांची मागणी आहे. (वार्ताहर)