लोणावळ्यातील 'मातृछाया' कोविड रुग्णालय तात्काळ बंद करा; बेजबाबदारपणामुळे रुग्णाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2020 12:08 AM2020-10-11T00:08:20+5:302020-10-11T00:17:09+5:30
मृत्यू झालेल्या रुग्णाला हाताळल्यानंतर हे पीपीई किट तिथेच सुरक्षा भिंतीलगत उघड्यावर जाळण्यात आले.. हा सर्व प्रकार सोशल मीडियावर देखील व्हायरल
लोणावळा : लोणावळ्यात नव्यानेच सुरू झालेले मातृछाया कोविड रुग्णालय तात्काळ बंद करा अशी मागणी मुख्याधिकारी रवी पवार यांनी मावळचे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केली आहे.
लोणावळा शहरात नव्याने मातृछाया हाॅटेलमध्ये कोविड रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. हे रुग्णालय सुरू झाल्याची कोणालाच कल्पना नाही. काल या ठिकाणी एका तरुणाचा दुदैवी मृत्यू झाला. त्यांची आँक्सिजन पातळी ४० पर्यत खाली आली असताना व रुग्णालयात कसलीही सुविधा उपलब्ध नसताना त्याला याठिकाणी दाखल करून घेण्यात आले व त्याचा दुदैवाने मृत्यू झाला. ही घटना समजल्यानंतर मुख्याधिकारी रवी पवार यांनी या रुग्णालयाला भेट दिली असता, त्याठिकाणी एकही वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नव्हते. रुग्णालयात पुरेशी सामुग्री उपलब्ध नाही, कर्मचारी नाही, व्हेंटिलेटरची सुविधा नाही केवळ बायपप मशिन ठेवण्यात आली आहे. त्याठिकाणी हाऊस किपिंगची एक व्यक्ती उपस्थित होती.
लोणावळा नगरपरिषद शून्य मृत्यूदराच्या दिशेने वाटचाल करत असताना व त्याकरिता वेगवेगळी अभियाने राबवली जात असताना इतके बेजबाबदारपणे रुग्णालय चालविणे बरोबर नाही असे या पत्रात म्हटले आहे. तसेच याठिकाणी मृत्यू झालेल्या रुग्णाला हाताळल्यानंतर पीपीई किट हे तेथेच सुरक्षा भिंतीलगत उघड्यावर जाळण्यात आले. स्थानिकांनी याबाबत तक्रारी केल्या. तसेच हा सर्व प्रकार सोशल मीडियावर देखील व्हायरल झाला आहे.
लोणावळा नगरपरिषदेला हे कोविड सेंटर सुरू झाल्याबाबत कोणतीच कल्पना देखील नव्हती. प्रांत अधिकारी यांची परवानगी घेत हे सेंटर सुरू करण्यात आले असून जनरल बेडकरिता येथे चार हजार रुपये दिवसाचे आकारले जातात ते शासकीय दरानुसार असले तरी सुविधा मात्र नसल्याने एका रुग्णांचा नाहक जीव गेला आहे. या सर्व प्रकरणाची प्रत्यक्ष स्थळ पाहणी केल्यानंतर वरील सर्व प्रकार समोर आला असल्याने सदर सेंटरची मान्यता तात्काळ रद्द करा अशी मागणी मुख्याधिकारी रवी पवार यांनी केली आहे. कोविडच्या नावाखाली रुग्णांच्या जीवाशी हा खेळ सुरू असल्याने तात्काळ हे सेंटर बंद करून दोषींवर कारवाई करा अशी माग'णी नगराध्यक्षा सुरेखा जाधव व उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी केली आहे.