महाराष्ट्र बंदचा परिणाम अायटी कंपन्यांवरही
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2018 07:50 PM2018-08-09T19:50:04+5:302018-08-09T19:51:49+5:30
मराठा क्रांती माेर्चाच्यावतीने अायटी कंपन्या सुद्धा बंद करण्याचा प्रयत्न केला. हिंजवडी तसेच पुण्यातील शारदा सेंटर येथे काही कंपन्यांमध्ये जाऊन काम बंद करण्यास अांदाेलकांनी सांगितले.
पिंपरी : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीनेमहाराष्ट्र बंद ची हाक देण्यात आली होती. त्याचे पडसाद हिंजवडी आयटी पार्क परिसरावरही उमटले. काही आंदोलकांनी दुपारी 3 च्या सुमारास हिंजवडीतील काँग्निझंट कंपनीकडे मोर्चा वळविला, काम बंद ठेवण्यास सांगून आंदोलक पुढे निघून गेले.
हिंजवडी आयटी पार्क परिसरातील बहुतांशी कंपन्यांनी काम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. वाहतूक सुविधेवर परिणाम जाणवणार हे लक्षात आल्याने आयटी अभियंत्यांना वर्क फ्रॉम होम असा पर्याय देण्यात आला होता. काँग्निझंट कंपनीतही मोजकेच लोक होते. आंदोलकांच्या सूचनांची कंपनी व्यवस्थापनाने दखल घेतली, त्यानंतर आंदोलक लगेच निघून गेले. कोणताही अनूचीत प्रकार घडला नाही. याचप्रकारे पुण्यातील मध्यवर्ती भागातील शारदा सेंटर बंद करण्यास सांगितले. काही अांदाेलकांनी शारदा सेंटरचे लाेखंडी गेट ताेडले. अायटी कंपन्यांनी या बंदच्या पार्श्वभूमिवर कर्मचाऱ्यांना सकाळी लवकर अाॅफिसला यायला सांगितले हाेते. तर काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याची परवानगी दिली.
संध्याकाळनंतर शहरातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली. सात नंतर काही दुकाने तसेच हाॅटेल उघडण्यात अाली.