वाढत्या नागरीकरणामुळे प्रदूषणाची लागण

By admin | Published: May 11, 2017 04:30 AM2017-05-11T04:30:27+5:302017-05-11T04:30:27+5:30

पवना नदीचे निर्मळ स्वरूप उर्से, बेबडओहोळ औद्योगिक परिसर आणि सोमाटणे, उर्से, परंदवडी, धामणे, बेबडओहोळसह वाढती

Impact of pollution due to increasing urbanization | वाढत्या नागरीकरणामुळे प्रदूषणाची लागण

वाढत्या नागरीकरणामुळे प्रदूषणाची लागण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
उर्से : पवना नदीचे निर्मळ स्वरूप उर्से, बेबडओहोळ औद्योगिक परिसर आणि सोमाटणे, उर्से, परंदवडी, धामणे, बेबडओहोळसह वाढती वस्ती असलेल्या भागात बदलत आहे. गेल्या पाच वर्षांत पवना नदीलगत गावातील लोकसंख्या वाढत असल्याने गावातील सांडपाणी मोठ्या प्रमाणात नदीला येऊन मिळत आहे. त्यामुळे आज पवना नदी संवर्धनाची गरज वाढू लागली आहे.
सडवली ते शिरगाव दरम्यान नदीचा प्रवास उर्से औद्योगिक परिसर, सोमाटणे येथील नागरी भागातून जातो. त्यामुळे नदीप्रदूषण हळूहळू वाढताना दिसते. सडवली गावाची लोकसंख्या सातशेच्या जवळपास आहे. तेथे ७०० एकर शेतीचे जमिनीचे क्षेत्र असून, बागायत क्षेत्र १५० एकरापर्यंत आहे. उर्वरित ५५० एकरात प्रामुख्याने भातपीक घेतले जाते. नदी, विहिरीवरून गावात पाणीपुरवठा केला जातो. सांडपाणी नदीला जात नसले, तरी गावातील ४०० ते ५०० जनावरे नदीवरच धुतली जातात, असे येथील ग्रामस्थांनी सांगितले. फिल्टर प्लॅण्ट जरी नसला, तरी नुकतीच गावात पाणीपुरवठा योजना नळाद्वारे केली आहे. पुढे नदीकाठालगतच्या आढे गावाची लोकसंख्या ८००च्या जवळपास आहे. गावात ५०० जनावरे असून, ती नदीवर धुतली जातात. गावातील सांडपाणी नदीला न सोडता शेतात सोडले जाते. जागोजागी कचराकुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे नदीप्रवाह प्रदूषित होत नाही. कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे आढे गावातील नदीवर बांधले पाहिजेत, अशी मागणी काही ग्रामस्थांनी केली. उर्से हे पवनमावळातील जास्त लोकसंख्या असलेले व झपाट्याने वाढणारे गाव आहे. औद्योगिक परिसर असल्याने गावात महिंद्रा हिनोदय, फिनोलेक्स केबल, जयहिंद व इतर मोठ्या कंपन्या आहेत. मोठे वर्कशॉप आहेत. गावातील लोकसंख्या आठ हजारच्या आसपास असल्याने ओढ्यामार्गे गावातील सांडपाणी, कंपनीचे पाणी मोठ्या प्रमाणावर नदीला मिळते. त्यावर कसलीही प्रक्रिया केली जात नाही. येथूनच पवनेच्या प्रदूषणाला सुरुवात होते. या पाण्यामुळे नदीच्या पाण्याला दुर्गंधी येत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
बेबडओहळ नदीकाठी असल्याने गावातील सांडपाणी, गटारीचे पाणी थेट नदीत मिसळते. त्यामुळे उर्से व बेबडओहोळ गावाजवळ प्रदूषण वाढलेले दिसते. पाण्याचा रंगही बदललेला जाणवतो. पुढे या पाण्याचा फटका बसतो धामणे गावाला. धामणेजवळील परंदवडी गावाची वाढणारी वस्तीही नदी प्रदूषित करण्यास हातभार लावते. गेल्या तीन वर्षांत गावात वाढलेली बांधकामे, शैक्षणिक संस्था यामुळे लोकसंख्या तीन हजारांवर झाली आहे. सांडपाणी, गटारींचे पाणी ओढ्यामार्गे नदीला मिळते. गावाला उत्पन्न कमी असल्याने फिल्टरेशनसाठी योजना करता येत नाही. परंदवडीसह उर्से, बेबडओहोळ गावांनी प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजना न केल्याने हा प्रश्न गंभीर झाला आहे. सडवली, ओझर्डे, आढे, उर्से, बेबडओहोळ , धामणे, परंदवडी येथे सात किमी अंतरावर सर्वाधिक प्रदूषण आहे. जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याची आवश्यकता आहे. नदीवर जलपर्णी नाही. ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब आहे.

Web Title: Impact of pollution due to increasing urbanization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.