पोलीस असल्याची तोतयागिरी, भामट्याला केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 01:01 AM2018-12-27T01:01:59+5:302018-12-27T01:02:19+5:30
पोलीस असल्याची बतावणी करून हॉटेलात फुकट खायचे, पथारीवाल्यांना दमदाटी करून हप्ते मागायचे, पान टपरीवाल्यांना धमकावून मिळेल ती रक्कम घ्यायची... कोणी विचारलेच, तर गुन्हे शाखेचा पोलीस अधिकारी आहे
पिंपरी : पोलीस असल्याची बतावणी करून हॉटेलात फुकट खायचे, पथारीवाल्यांना दमदाटी करून हप्ते मागायचे, पान टपरीवाल्यांना धमकावून मिळेल ती रक्कम घ्यायची... कोणी विचारलेच, तर गुन्हे शाखेचा पोलीस अधिकारी आहे; पोलीस ठाण्यात घेऊन गेल्यावर कळेल, मी कोण आहे ते... असे दरडावत पोलिसाच्या आविर्भावात वावरणाऱ्या भामट्याला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने बुधवारी भोसरी येथून जेरबंद केले. चाकण पोलिसांकडे त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची कुंडली मिळाली असून, राजेंद्र मोहन पाटेकर (रा. भोसरी) असे या तोतया पोलीस अधिकाºयाचे नाव आहे.
पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करीत चाकण परिसरात हॉटेल व्यावसायिक, पान टपरीचालक, पथारीवाले आणि किराणा दुकानदार यांच्याकडून एकजण पैसे उकळत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट एकचे हवालदार दीपक खरात, पोलीस शिपाई गणेश सावंत, प्रवीण पाटील, विशाल भोईर यांना मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांना याबाबतची माहिती देण्यात आली. आरोपीचे छायाचित्रही प्राप्त झाले होते. २६ डिसेंबर २०१८ला बुधवारी तो भोसरीत अंकुशराव लांडगे सभागृहाजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. पोलीस उपनिरीक्षक काळुराम लांडगे व पथकाने सापळा रचून त्यास ताब्यात घेतले. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली असता, त्याच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल असल्याचे उघडकीस आले आहे.
पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहायक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, पोलीस उपनिरीक्षक काळुराम लांडगे, हवालदार दीपक खरात, प्रमोद लांडे, सचिन उगले, गणेश सावंत यांच्या पथकाने ही कारवाई केली.
संत तुकारामनगर, भोसरी येथील पाण्याच्या टाकीजवळ राहण्यास असलेल्या राजेंद्र मोहन पाटेकर या आरोपीचे वय ५५ आहे. पोलिसांना साजेसे व्यक्तिमत्त्व असलेल्या या आरोपीवर चाकण पोलीस ठाण्यात विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरोधात गंभीर स्वरूपाचे फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.