विकास आराखड्याची हवी अंमलबजावणी
By admin | Published: March 30, 2017 02:14 AM2017-03-30T02:14:30+5:302017-03-30T02:14:30+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाला आहे. पिंपरी-चिंचवडच्या जनतेने भारतीय जनता पक्षाच्या
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाला आहे. पिंपरी-चिंचवडच्या जनतेने भारतीय जनता पक्षाच्या हाती एकहाती सत्ता दिली आहे. त्यामुळे विकासासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. शहरातील पायाभूत सुविधा सक्षम करण्याबरोबरच शहर विकासाच्या योजना प्रभावीपणे राबविणार आहोत. विकास आराखडा जाहीर केल्यानंतर त्यातील आरक्षणांची काटेकोरपणे अंमलबजावणी केल्यास नियोजित विकासाचे ध्येय साध्य करता येते. रस्ते, उद्याने, बाजारपेठा, शाळा, दवाखाने ही आरक्षणे विकसित केल्यास शहराच्या विकासाला गती मिळेल. नगरनियोजन आणि अंमलबजावणीसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. तेव्हाच स्मार्ट सिटीचे स्वप्न साकार हाईल.
अत्यंत वेगाने विकसित होणारे शहर म्हणजेच पिंपरी-चिंचवड हे शहर अत्यंत झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे लोकसंख्यावाढीचा आलेख पाहता भविष्यात शहर स्मार्ट करण्याच्या दृष्टीने लोकप्रतिनिधी, प्रशासनाने व्यापक प्रयत्न करण्याची गरज आहे. आज शहराची लोकसंख्या २० लाखांवर जाऊन ठेपली आहे. पुढील १० ते २० वर्षांत ही लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. त्यामुळे पुढील काही वर्षांचा कालखंड डोळ्यासमोर ठेऊन पिंपरीचा आराखडा तयार करणे गरजेचे आहे. इतर शहरांची तुलना करायची झाल्यास आपले शहर स्मार्ट, सुंदर आहे, यात शंकाच नाही. येथील प्रशस्त रस्ते, झालेला सर्वांगीण विकास देदीप्यमानच आहे. हे शहर आणखी चांगले करण्यासाठी सर्वांचे एकत्रित प्रयत्न, जनतेचा सहभाग आवश्यक आहे. पिंपरी-चिंचवडमधील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन आणि पिंपरी-चिंचवडमधील सर्व भाजपाच्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे महापालिकेत भाजपाची सत्ता आली आहे. नागरिकांनी मोठ्या विश्वासाने आपल्या हाती सत्ता दिली आहे. त्यामुळे विकासासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
निगडी ते दापोडी, रावेत ते औंध हा रस्ता आणि बोपोडी ते वाकडेवाडी, औंध पूल ते परिहार चौक येथील रस्ता या मार्गावर वाहतुकीवर ताण येतो. औंध पुलापर्यंत आणि बोपोडी पुलापर्यंत येणाऱ्या माणसाला पुण्याकडील पुढील प्रवास नकोसा वाटतो. त्याचबरोबर हिंजवडी ते जगताप डेअरी, हिंजवडी ते थेरगाव या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत असते. त्यामुळे नागरिकांना कोंडीचा त्रास होतो. यावरही उपाययोजना करायला हवी.
जलद प्रवासासाठी मेट्रो हवीच
हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रोबरोबरच हिंजवडी ते चाकण असा मेट्रोचा मार्ग तयार करायला हवा. त्यातून जलद प्रवास करणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर मेट्रो सेवा सुरू करताना प्रवाशांच्या आर्थिक गणिताचाही विचार केला जावा. हा प्रवास सामान्यांच्या खिशाला परवडणारा असावा. पिंपरी-पुणे हा मेट्रो मार्ग प्रस्तावित केला आहे. त्याचबरोबर चाकण-हिंजवडी असा मार्गही तयार करण्याची गरज आहे. पिंपरीपर्यंतची मेट्रो निगडीपर्यंत न्यावी, अशी आमची मागणी आहे. तसेच विकास आराखड्यात रिंगरोड प्रस्तावित आहे. त्याचबरोबर भक्ती-शक्ती चौकाजवळील उड्डाणपूल पुढे स्पाइन रस्त्यामधील अडथळा दूर होऊन हा रस्ता थेट चऱ्होलीपर्यंत जोडला जाणार आहे. अनधिकृत बांधकामांच्या प्रश्नाबाबत राज्यशासनाने न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र सादर केले. शास्तीबाबतही नागरिकांना सूट दिली आहे.
लक्ष्मण जगताप
(लेखक चिंचवडचे आमदार असून, भाजपाचे शहराध्यक्ष आहेत.)