महत्त्वाच्या स्थानकास ग्रासले समस्यांनी
By admin | Published: January 23, 2017 02:48 AM2017-01-23T02:48:48+5:302017-01-23T02:48:48+5:30
पुणे - लोणावळा लोहमार्गावरील मध्यवर्ती ठिकाणी असलेले तळेगाव हे जंक्शन रेल्वे स्थानक असून, प्रवाशांची सर्वात जास्त वर्दळ आहे
तळेगाव दाभाडे : पुणे - लोणावळा लोहमार्गावरील मध्यवर्ती ठिकाणी असलेले तळेगाव हे जंक्शन रेल्वे स्थानक असून, प्रवाशांची सर्वात जास्त वर्दळ आहे. येथील मासिक उत्पन्न दोन कोटी रुपयांच्या आसपास आहे. सुमारे २५ हजार प्रवासी स्थानकावरून रोजची ये - जा करतात. पुणे - मुंबई सिंहगड एक्सप्रेस, भुसावळ - नाशिक एक्सप्रेस या लांब पल्ल्यांच्या गाड्यांना येथे जाता-येता थांबा मिळावा, अशी प्रवाशांची अनेक दिवसांपासूनची मुख्य मागणी आहे.
या मागणीसाठी मावळ तालुका रेल्वे प्रवासी संघाच्या वतीने अनेकदा आंदोलनेही छेडण्यात आली. शासनाचे व रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रवाशांनी या स्थानकावर रेल रोको आंदोलनही केले. पाठपुरावा करूनही रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या या रास्त मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावत आल्याचा आरोप मावळ तालुका रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष पोपटराव भेगडे व खजिनदार पांडुरंग भेगडे यांनी केला आहे.
तळेगाव दाभाडे येथे केंद्रिय संरक्षण विभागाचा डेपो (डीओडी) असल्याने मालवाहतूक व कर्मचाऱ्यांच्या प्रवासासाठी तळेगाव रेल्वे स्थानक महत्त्वाचे आहे. मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर आदी तालुके व नगर जिल्ह्याचा पश्चिम भाग यांचे मुंबईशी दळणवळण सोयीचे व्हावे, या उद्देशाने ब्रिटिशांनी हे स्थानक उभारले. त्यामुळे डेपोचे कर्मचारी, लष्कराचे जवान, अधिकारी व नागरिक यांची चांगली सोय झाली.
नंतरच्या काळात तळेगाव एमआयडीसीची उभारणी झाल्याने तळेगाव दाभाडे शहर व परिसराचा झपाट्याने विकास झाला. आल्हाददायक हवामानामुळे नागरिकांचा सदनिका खरेदीकडे ओढा वाढला. त्यामुळे झपाट्याने नागरीकरण वाढले. साहजिकच रेल्वे प्रवाशांची संख्याही वाढल्याने स्थानकाचा मासिक उत्पन्नाचा आलेख कायम चढता राहिला आहे.
या महत्त्वाच्या स्थानकास सध्या समस्यांनी ग्रासले आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सोय नाही. दोन्ही फलाटांना जोडणारा एकच पादचारीपूल असल्याने अनेक प्रवासी जीव धोक्यात घालून रुळ ओलांडतात. पादचारी पुलावर छत नसल्याने प्रवाशांचे ऊन, वारा, पाऊस, थंडी यापासून संरक्षण होत नाही. छताअभावी प्रवासी त्रस्त आहेत. पादचारी पुलावरून थेट यशवंतनगर भागात जाता येत नाही. पुलाचे एक्स्टेंशन होणे गरजेचे आहे.
दोन्ही फलाटांच्या बाजूला तिकीटघर आहे. पूर्वेकडील तिकीटघराजवळील भाग अस्वच्छ आहे. प्रशासनाने तिकीटघराजवळ ‘येथे थंकू नका ’ असा फलक लावून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र तेथे व्यसनी प्रवाशांनी पानाच्या पिचकाऱ्या मारल्याने तो भाग विद्रूप झाला आहे.
आरक्षण केंद्रात गर्दीच्या वेळी येथे पाकीटमारी होते. प्रवासांना रेल्वे गाडीत चढताना - उतरताना अनेकदा पाकीटमारीस सामोरे जावे लागते. फलाटावर पोलिसांची कायम गस्त हवी. रात्री तर प्रवासी महिलांचे संरक्षण म्हणजे मोठा प्रश्न आहे. चोहोबाजूंनी गर्दुल्यांचा मुक्त संचार असल्याने प्रवासी भीतीच्या छायेखाली असतात. रात्री प्रवाशांना लुटल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. भुरट्या चोरांचा सुळसुळाट आहे. (वार्ताहर)