गावकी-भावकीपेक्षा खर्चालाच महत्त्व?
By admin | Published: February 17, 2017 04:49 AM2017-02-17T04:49:20+5:302017-02-17T04:49:20+5:30
या वेळेस सोमाटणे गणातील पंचायत समिती सदस्यपदाची निवडणूक पचरंगी होणार असल्याने प्रबळ उमेदवार आपापली ताकत
उर्से : या वेळेस सोमाटणे गणातील पंचायत समिती सदस्यपदाची निवडणूक पचरंगी होणार असल्याने प्रबळ उमेदवार आपापली ताकत लावून प्रचाराला लागले आहेत. थोडेच दिवस बाकी राहिल्याने येथील राजकारण चांगलेच तापू लागले.
सर्वसाधारण वर्गासाठी असल्याने सोमाटणे गणातील लढतीकडे तालुक्याचे लक्ष असणार आहे. सर्व पक्षश्रेष्ठींच्याही नजरा लागल्या आहेत. मात्र, यंदा गावकी-भावकीपेक्षा कोण किती खर्च करणार तोच निवडून येणार, अशी चर्चा कार्यकर्त्यांकडून होत आहे. गणात भाजपाचे वर्चस्व असल्याने भाजपा आपला बालेकिल्ला राखण्यासाठी आखणी करीत आहे. मात्र, यंदा कांग्रेस,भाजपा, राष्ट्रवादी व शिवसेना पक्षातील चार उमेदवार असल्याने ‘काटे की टक्कर’ पहावयास मिळणार आहे. पर्वा न करता मोठ्या प्रमाणात खर्च होऊ लागल्याने कार्यकर्तेही अकधी या उमेदवाराकडे तर कधी त्या उमेदवाराकडे अशा उड्या मारु लागले आहेत. त्यामुळे या गणातील कार्यकर्त्यांची चांगलीच चांदी होत आहे. गणात सर्वसाधारण असल्याने गावकी भावकीपेक्षा खर्च कोण करणार याला महत्त्व आल्याचे बोलले जाते. प्रचारास थोडेच दिवस मिळत असल्याने प्रचारयंत्रणेस वेग आला आला आहे. आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. कोणी किती विकास केला, कोणती कामे केली, आत्ता बदल हवा अशा आशयाच्या पोस्ट व्हॉट्स अॅपवरून फिरत आहेत.
पंचायत समिती गणातून कांग्रेसचे बाळकृष्ण पोटवडे, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे साहेबराव कारके, शिवसेनेचे शांताराम भोते व भाजपाचे उमेश बोडके, अपक्ष पुष्पा आनंद गायकवाड हे पाच उमेदवार रिंगणात आहेत. सोमाटणे गणात ओझर्डे, आढे, बेबडोहोळ, पिंपळखुटे, उर्से, परंदवडी, धामणे, गोडुंब्रे, शिरगाव,गहुंजे,सोमाटणे, शिवणे, सडवली आदी गावांचा समावेश आहे. गणात एकूण २८९३८ एवढी मतदार संख्या असून, सोमाटणे व उर्से या गावांत जास्त मतदार आहेत. पवन मावळातील अत्यंत महत्त्वाच्या या गणाकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत.