स्वच्छ सर्वेक्षणात पिंपरी चिंचवड शहराला यंदा देशात 24 तर राज्यात सातवा क्रमांक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 02:45 PM2020-08-20T14:45:14+5:302020-08-20T14:47:16+5:30
मागील वर्षी पिंपरी शहराचा देशात 52 तर राज्यात 13 वा क्रमांक आला होता...
पिंपरी : मागील तीन वर्षांपासून स्वच्छ सर्वेक्षणात पिछाडीवर जात असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराची यंदा सर्वेक्षणात सुधारणा झाली आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत सर्वेक्षणात पिंपरी-चिंचवड शहराचा देशात 24 वा क्रमांक आला आहे. तर, राज्यात पिंपरी शहर पहिल्या दहामध्ये आले असून सातवा क्रमांक आला आहे. सर्वेक्षणाचा गुरुवारी निकाल जाहीर झाला आहे. याबाबतची माहिती मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी दिली. दरम्यान, मागील वर्षी देशात 52 तर राज्यात 13 वा क्रमांक आला होता.
व्यापक स्वरुपात नागरिकांचा व समाजातील सर्व स्तरांचा सहभाग स्वच्छ भारत अभियानामध्ये घेणे व याकरिता त्यांच्यामध्ये माहिती, शिक्षण व संवादाद्वारे साधून त्यांच्या वर्तनातील बदल घडवणे हा या सर्वेक्षणाचा प्रमुख हेतू होता. केंद्र सरकारने मागील वर्षापासून स्वच्छ सर्वेक्षणात बदल केले होते. स्वच्छ सर्वेक्षण वर्षातून एकाचवेळी करण्याचे बंद केले. त्याऐवजी तीन टप्प्यात सर्वेक्षण केले जाते. पहिल्या लीगमध्ये पिंपरी-चिंचवड शहराचा सहावा तर दुस-या लीगमध्ये 14 वा क्रमांक आला होता. आता या अभियानाचा अंतिम निकाल लागला आहे. त्यात शहराची सुधारणा झाली आहे. देशात 24 वा तर राज्यात सातवा क्रमांक आला आहे. मागील तीन वर्षाच्या तुलनेत शहराची मोठी सुधारणा झाली आहे.
पालिकेचे मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय म्हणाले, ''आरोग्य विभागाच्या कर्मचा-यांनी चांगले काम केले आहे. त्यामुळेच 52 वरुन शहराचा नंबर 24 वर आला आहे. तर, राज्यात सातवा क्रमांक आहे. स्टार रेटिंग मिळाले नाही. त्यात 600 मार्क कमी पडले. ते मिळाले असते तर शहर 15 व्या नंबरवर आले असते. पुढच्यावर्षी दहाच्या आतमध्ये आणण्यासाठी आरोग्य विभागाचा प्रयत्न असणार आहे''.
.....
असा वाढला आलेख
2016 मध्ये स्वच्छ भारत अभियानात पिंपरी-चिंचवड शहर टॉप 10 मध्ये होते. शहराचा 9 वा क्रमांक आला होता. तर, महाराष्ट्रातून 1 नंबर आला होता. 2017 पासून त्यात घसरण सुरु झाली होती. 2017 मध्ये पिंपरी-चिंचवड शहर पिछाडीवर गेले. 9 व्या क्रमांकावर असलेले पिंपरी-चिंचवड शहर थेट 72 व्या नंबरवर फेकले गेले होते. तर, 2018 मध्ये देशात 43 वा क्रमांक आला होता. तर, राज्यात सहावा क्रमांक होता. 2019 मध्ये पुन्हा त्यामध्ये घसरण झाली होती. शहराचा देशात 52 वा तर राज्यात 13 वा क्रमांक आला होता. यावेळी 2020 मध्ये स्वच्छ सर्वेक्षणात शहराची सुधारणा झाली आहे. देशात 24 वा तर राज्यात सातवा क्रमांक आला आहे.