‘जार’मधील अशुद्ध पाणी शहरातील नागरिकांच्या माथी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2019 12:48 AM2019-03-03T00:48:09+5:302019-03-03T00:48:21+5:30

शहरामध्ये एक दिवस पाणी कपात सुरू करण्यात आली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला आहे.

The impure water of 'Jar' is due to the citizens of the city | ‘जार’मधील अशुद्ध पाणी शहरातील नागरिकांच्या माथी

‘जार’मधील अशुद्ध पाणी शहरातील नागरिकांच्या माथी

Next

- प्रकाश गायकर 
पिंपरी : शहरामध्ये एक दिवस पाणी कपात सुरू करण्यात आली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला आहे. अशा परिस्थितीमध्ये पाण्याची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना ‘अच्छे दिन’ आल्याचे पाहायला मिळत आहे. मिनरल वॉटरच्या नावाखाली जारमधून अशुद्ध पाणीविक्रीचा गोरखधंदा शहरामध्ये जोरात सुरू आहे. यावर प्रशासनाचेही नियंत्रण नसल्याने शहराच्या गल्ली बोळामध्ये थंड पाण्याच्या जारची दुकाने थाटलेली दिसत आहेत.
कमी खर्चामध्ये, कमी जागेमध्ये जास्त नफा कमावून देणारा व्यवसाय म्हणून पाणी विक्रीच्या व्यवसायाकडे पाहिले जाते. सुरुवातीला पाणी शुद्धीकरणाचे प्रकल्प रावबून व्यवसाय करणारे मोजकेच व्यावसायिक होते. नंतर या व्यवसायाने विशाल रूप धारण केले आणि त्यातील शुद्धता हरवली. आता भूगर्भातील पाणी उपसून थंड करून विकण्यास कमी खर्च लागत आहे. त्यामुळे गल्ली-बोळामध्ये असे व्यवसाय सुरू झाले आहेत. मात्र यामध्ये पाण्याच्या शुद्धतेबाबत कोणतीही उपाययोजना केली जात नाही. तसेच, त्यावर कोणतीही माहिती देण्यात येत नाही.
महापालिकेचा पाणीपुरवठा व बोअरवेलमधून पाण्याचा उपसा करून ते थंड केले जाते. ते पाणी जारमध्ये भरून त्याची ४० ते ५० रुपये दराने विक्री केली जात आहे. विविध सण, समारंभ, लग्न, पार्ट्या यासाठी नागरिक जारची मागणी करतात. तसेच अनेक नागरिक शुद्ध पाणी पिण्यासाठी मिळावे म्हणून दररोज घरामध्येही या जारची मागणी करतात. शासकीय कार्यालये, दुकाने यामध्येही जारच्या पाण्याला मागणी असल्याने विक्रेत्यांना चांगले दिवस आले आहेत. गल्लोगल्लीच्या या दुकानांमुळे ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच सावध होऊन या अशुद्ध पाणी विक्रीला आळा घालायला हवा. पाणीविक्री करणारे व्यावसायिक नियमांमधून पळवाट काढत आहेत. पाण्याच्या जारवर आपल्या कंपनीचे लेबल लावून पाणी विक्री केली जाते.
>गल्लीबोळात अन् घरातच थाटले व्यवसाय
कोणताही व्यवसाय सुरू करण्याकरिता महापालिका प्रशासन व ग्रामीण भागामध्ये प्रशासकीय परवानगी आवश्यक असते. सोबतच व्यवसायाचा परवानाही लागतो. परंतु पाण्याचे जार विक्री करणाºया व्यावसायिकांना कुठलीही नियमावली नसल्याने पाणी विक्री करणाºयाचे फावले आहे. प्रशासनाची परवानगी न घेता घरीच एक खोली किंवा शेड टाकून पाण्याचा व्यवसाय सुरू केला आहे.
गुणवत्ता तपासणीची नाही यंत्रणा
कडक उन्हाळा सुरू झाल्यावर नागरिकांकडून थंड पाण्याची मागणी वाढते. या पाण्याची चार पाच दिवसांनी आपोआप चव बदलत असल्याने या पाण्याची गुणवत्ता लक्षात येते. पाण्याच्या गुणवत्ते संदर्भात जारवर कुठलीही माहिती दिली जात नाही. त्यामुळे जारच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी ग्राहकांवरच आहे. अन्यथा हे हवेसे वाटणारे थंड पाणी ग्राहकांच्या आरोग्याला बांधा निर्माण करू शकते.

Web Title: The impure water of 'Jar' is due to the citizens of the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.