हिंजवडीत पिस्तुलाच्या धाकावर लुटायचे, पोलिसांनी पुलाखाली सापळा रचून आवळल्या दोघांच्या मुसक्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 02:35 PM2024-05-29T14:35:29+5:302024-05-29T14:36:57+5:30
आरोपींकडून दोन पिस्तूल, सहा काडतुसे आणि दोन दुचाकी जप्त केल्या...
पिंपरी : पिस्तूलचा धाक दाखवून लुटमार करणाऱ्या दोन सराईतांना अटक केली. त्यांच्याकडून दोन पिस्तूल, सहा काडतुसे, दोन दुचाकी जप्त केल्या; तसेच सोनसाखळी देखील हस्तगत केली. हिंजवडीपोलिसांनी ही कारवाई केली.
अजय शंकर राठोड (२१, रा. पाषाण), जिशान जहीर खान (२३, रा. दापोडी, मूळ रा. उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिस उपायुक्त बापू बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन संशयित हे गावठी कट्टे घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार हिंजवडी पोलिसांनी माण-हिंजवडी आणि सूस पुलाखाली सापळा लावला. तेथे संशयित अजय आणि जिशान यांना ताब्यात घेतले. अजय याच्या ताब्यातून ५१ हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे व एक दुचाकी मिळून आली. जिशान याच्याकडे ८७ हजार रुपये किमतीचा एक गावठी कट्टा, चार काडतुसे व दुचाकी मिळून आली.
अजय आणि जिशान हे एकमेकांचे मित्र असून, त्यांनी दोन्ही दुचाकी बावधन व सूस येथे चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. अजय व जिशान यांनी सूस पुलाजवळील डोंगरावर पाषाण येथे त्यांच्या इतर तीन साथीदारांसह मिळून गावठी पिस्तूलचा धाक दाखवून एका व्यक्तीचे अपहरण केले. त्या व्यक्तीच्या गळ्यातील आठ ग्रॅम वजनाची सोनसाखळी जबरदस्तीने काढून घेतली असल्याचे तपासातून समोर आले. पोलिसांनी त्यांच्याकडून ३५ हजार रुपये किमतीची आठ ग्रॅम वजनाची सोनसाखळी हस्तगत केली. याबाबत चतु:श्रुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. अजय आणि जिशान यांच्या विरोधात हिंजवडी पोलिस ठाण्यात चार, तर चतु:श्रुंगी पोलिस ठाण्यात दोन असे वेगवेगळे सहा गुन्हे दाखल आहेत.
वरिष्ठ पोलिस कन्हैया थोरात, पोलिस निरीक्षक (गुन्हे) ऋषिकेश घाडगे, सहायक निरीक्षक राम गोमारे, पोलिस अंमलदार बंडू मारणे, बाळकृष्ण शिंदे, नरेश बलसाने, बापूसाहेब धुमाळ, योगेश शिंदे, कैलास केंगले, कुणाल शिदे, विक्रम कुदळ, अरुण नरळे, रितेश कोळी, श्रीकांत चव्हाण, चंद्रकांत गडदे, कारभारी पालवे, दत्ता शिंदे, अमर राणे, ओमप्रकाश कांबळे, सागर पंडित यांच्या पथकाने ही कामगिरी केली.