पिंपरीमध्ये वीजबिल ‘अपडेट’च्या बहाण्याने वृद्धाला अडीच लाखांचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 09:45 PM2022-07-21T21:45:59+5:302022-07-21T21:50:01+5:30
पिंपरीतील फसवणुकीची घटना...
पिंपरी : एमएसईबी मीटरचे पेमेंट अपडेट करण्याच्या नावाखाली ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर बँक खात्यातून दोन लाख ६० हजार रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करून वृद्धाची फसवणूक केली. ही घटना मंगळवारी (दि.१९) सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास यशवंतनगर, पिंपरी येथे घडली.
अनिल पूनमचंद भावसार (वय ७४, रा. यशवंतनगर, पिंपरी) यांनी या प्रकरणी बुधवारी (दि. २०) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. एमएसईबी बिल अपडेट ऑफिसर असलेल्या अज्ञात व्यक्तीच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या मोबाइलवर मंगळवारी आरोपीने एमएसईबी बिल ऑफिसरच्या नावाने मेसेज केला. तुमच्या घरातील एमएसएईबी मीटरचे पेमेंट अपडेट करा. पेमेंट अपडेट न केल्यास रात्री नऊपर्यंत लाइट बंद करण्यात येईल, असे आरोपीने सांगितले.
तसेच क्विक सपोर्ट ॲप डाऊनलोड करण्यास सांगून १० रुपये चार्जेस नेट बँकिंग किंवा डेबिट कार्डद्वारे भरण्यास सांगितले. त्यानंतर फिर्यादीच्या मोबाइल ॲपवर अनेक ओटीपी आले. हे ओटीपी फिर्यादीने कोणाशी शेअर केले नाहीत. तरीदेखील फिर्यादीच्या पत्नीच्या बँक खात्यातून पेटीएमद्वारे ६० हजार, एक लाख व पुन्हा एक लाख असे दोन लाख ६० हजार रुपये ऑनलाइन ट्रान्सफर झाले, असे फिर्यादीत नमूद आहे.