पिंपरी-चिंचवड शहरात २४ होर्डिंगधारकांसह ७२ जणांवर गुन्हे दाखल; महापालिकेची मोठी कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 11:12 AM2024-05-23T11:12:43+5:302024-05-23T11:15:01+5:30
अनधिकृत आढळलेल्या २४ होर्डिंग्जधारकांसह जागामालक व जाहिरातदार अशा एकूण ७२ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये विद्यमान खासदारांच्या मुलासह चिंचवड येथील राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाच्या मुलाचाही समावेश आहे....
पिंपरी : वादळी वाऱ्याने अनधिकृत होर्डिंग कोसळून जीवित व वित्तहानी होऊ लागल्याने महापालिकेने अनधिकृत होर्डिंग्जवर धडक कारवाई सुरू केली आहे. अनधिकृत आढळलेल्या २४ होर्डिंग्जधारकांसह जागामालक व जाहिरातदार अशा एकूण ७२ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये विद्यमान खासदारांच्या मुलासह चिंचवड येथील राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाच्या मुलाचाही समावेश आहे.
महापालिकेच्या वतीने फलकधारकांसाठी नवीन स्ट्रक्चरल ऑडिट फॉरमॅट लागू करण्यात येणार आहे. यामुळे जाहिरात फलकधारक शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करू शकतील. शिवाय ते सुरक्षित जाहिरात फलक उभारण्याची जबाबदारी टाळू शकणार नाहीत. जाहिरात फलकांचे नियमित सर्वेक्षण आणि अनधिकृत फलकांवर होणारी कारवाई नेहमीची प्रक्रिया असून ती पुढेही सुरूच राहणार आहे. तशा कारवाई सूचना सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत, असे उपायुक्त संदीप खोत यांनी सांगितले.
गुन्हे दाखल झालेल्यांत खासदार, नगरसेवकांच्याही मुलांचाही समावेश आहे. खासदारपुत्र प्रताप श्रीरंग बारणे आणि माजी नगरसेवकपुत्र हर्षवर्धन भाऊसाहेब भोईर यांच्यासह एकूण २४ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.
होर्डिंग्जचा वाढीव आकार नको
शहरात २४ अनधिकृत होर्डिंग्ज आणि ३४१ होर्डिंगचे जास्त आकार असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले. होर्डिंग्जचा वाढीव आकार कमी करण्याबाबत नोटिसा देण्यात येत आहेत. होर्डिंग्जचा आकार नियमानुसार बदलला नाही तर ते हटविण्यात येणार आहेत, अशी माहिती सहआयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी दिली.
खात्री करूनच जाहिरात लावा
जागामालक, जाहिरातधारक यांनी कोणत्याही खासगी जागेमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी लोखंडी स्ट्रक्चरवर होर्डिंग बसविताना कोणतीही जीवित किंवा वित्तहानी होणार नाही याची काळजी घ्यावी. जाहिरातधारकाने महापालिकेच्या हद्दीमध्ये होर्डिंगवर जाहिरात करताना होर्डिंगधारकाने आकाशचिन्ह व परवाना विभागाकडून रीतसर परवानगी घेतली आहे की नाही याची खातरजमा करावी. परवानगी घेतली नसल्यास संबंधित जाहिरातदार, जागामालक तसेच फलकधारकावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
- शेखर सिंह, आयुक्त, महापालिका