दहावीच्या निकालात ९७.९५ टक्क्यांसह पिंपरी चिंचवड शहरात यंदाही मुलींचीच आघाडी

By प्रकाश गायकर | Published: May 27, 2024 06:40 PM2024-05-27T18:40:38+5:302024-05-27T18:40:57+5:30

मागील वर्षी २०२३ मध्ये ९६.७२ टक्के निकाल लागला होता. तर यंदा निकालात १.२३ टक्क्यांनी वाढ झाली आहे....

In Pimpri Chinchwad city with 97.95 percent in the 10th class results, girls are leading this year as well | दहावीच्या निकालात ९७.९५ टक्क्यांसह पिंपरी चिंचवड शहरात यंदाही मुलींचीच आघाडी

दहावीच्या निकालात ९७.९५ टक्क्यांसह पिंपरी चिंचवड शहरात यंदाही मुलींचीच आघाडी

पिंपरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी बोर्डाच्या परीक्षेचा राज्याचा निकाल सोमवारी (दि.२७) ऑनलाइन जाहीर झाला. यामध्ये पिंपरी-चिंचवड शहराचा निकाल ९७.९५ टक्के लागला. यामध्ये ९७.३५ टक्के मुलांचा, तर ९८.६१ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. यावर्षीही मुलींनी पुन्हा एकदा आघाडी घेतली आहे. मागील वर्षी २०२३ मध्ये ९६.७२ टक्के निकाल लागला होता. तर यंदा निकालात १.२३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

ऑनलाइन निकाल पाहण्यासाठी सकाळपासूनच लगबग सुरू होती. बहुतांश विद्यार्थ्यांनी मोबाइलवरच निकाल बघितला. तर काही विद्यार्थ्यांनी शाळेत एकत्र येत निकाल बघितला. शहरामध्ये दहावीच्या परीक्षेला एकूण १९ हजार ८६० विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केला होता. यामध्ये १० हजार ४५० मुले आणि ९ हजार ४१० मुली होत्या. त्यापैकी एकूण १९ हजार ८२३ विद्यार्थी बसले होते. त्यामध्ये १० हजार ४३४ मुले, तर ९ हजार ३८९ मुली होत्या. तर शहराचा एकूण निकाल ९७.९५ टक्के लागला असून, मुलांचा निकाल ९७.३५ टक्के, तर मुलींचा निकाल ९८.६१ टक्के लागला.

पिंपरी-चिंचवड शहरात एकूण १ हजार २७० पुन:परीक्षार्थी विद्यार्थ्यांपैकी ९२१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर पुन:परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा निकाल ७२.५१ टक्के इतका लागला. दहावीचा ऑनलाइन निकाल जाहीर होणार असल्याने सकाळपासून विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. अनेक विद्यार्थी निकाल बघितल्यानंतर आपल्या मित्र-मैत्रिणींना फोनवर निकालाबाबत सांगत होते. तर काहीजण एकमेकांना भेटून आंनदोत्सव साजरा करीत होते.

महापालिका शाळांचा निकाल ९५.५२ टक्के

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या १८ माध्यमिक शाळांचा निकाल ९५.५२ टक्के लागला. दहावीच्या परीक्षेसाठी महापालिकेच्या १८ शाळांमधून १९४१ विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेसाठी अर्ज केला होता. त्यापैकी १७७० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर ९ विद्यार्थी गैरहजर होते. १६२ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले असून, १८ शाळांचा निकाल ९५.५२ टक्के लागला आहे.

Web Title: In Pimpri Chinchwad city with 97.95 percent in the 10th class results, girls are leading this year as well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.