पिंपरी चिंचवडमध्ये 'मविआ' आणि महायुतीचा तिढा सुटला; मात्र बंडखोरांना थंड करण्याचे आव्हान असणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 07:06 PM2024-10-28T19:06:37+5:302024-10-28T19:07:39+5:30
आघाडीत पिंपरी-चिंचवड शहरातील तिन्ही जागा शरद पवार गट लढवणार गटाला तर महायुतीकडून भाजप अन् अजित पवार गट रिंगणात
पिंपरी : विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीत चिंचवड, भोसरीच्या जागेवरून निर्माण झालेला तिढा अखेर रविवारी सुटला. या जागांवर राष्ट्रवादीसह शिवसेना आणि काँग्रेसने दावा केला होता. आठवड्याच्या चर्चेच्या गुऱ्हाळानंतर या दोन्ही जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला गेल्या आहेत. भोसरीतून माजी स्थायी समिती सभापती अजित गव्हाणे यांची, तर चिंचवडमधून शिवसेनेचे माजी गटनेते राहुल कलाटे यांची उमेदवारी जाहीर झाली. आघाडीतील जागा वाटपात पिंपरी-चिंचवड शहरातील तिन्ही जागा शरद पवार गटाला मिळाल्या आहेत.
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर पहिल्याच टप्प्यात महायुतीतून चिंचवडमधून भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांना, तर भोसरीतून आमदार महेश लांडगे यांना उमेदवारी जाहीर झाली होती. त्यानंतर, राष्ट्रवादी अजित पवार गटाने पिंपरीतून आमदार अण्णा बनसोडे आणि मावळमधून सुनील शेळके यांचे नाव जाहीर केले.
महायुतीचे उमेदवार जाहीर झाले असताना, महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित होत नव्हते. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तिन्ही मतदारसंघांवर राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसने दावा केला होता. तीनपैकी एक जागा शिवसेनेला आणि दोन जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला जातील, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, तिन्ही जागा शरद पवार गटाला दिल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतील शिवसेनेत नाराजीचा सूर आहे. मावळमधून सुनील शेळके यांच्याविरोधात बापूसाहेब भेगडे अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत. त्यांना भाजपच्या नेत्यांनी पाठिंबा देत प्रचार सुरू केला आहे. महाविकास आघाडीतील शरद पवार गटाच्या वाट्याला ही जागा आहे. शेळके यांनी कोंडी करण्यासाठी महाविकास आघाडी भेगडे यांना पाठिंबा देईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
निर्णय रखडला आणि जीव टांगणीला लागला
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून पिंपरीतून शनिवारी सुलक्षणा शीलवंत-धर यांना उमेदवारी जाहीर झाली. मात्र, चिंचवड आणि भोसरीबाबत निर्णय होत नव्हता. नेत्यांचे चर्चेचे गुऱ्हाळ सुरू होते. इच्छुक मुंबईमध्ये ठाण मांडून होते. रविवारी दुपारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन यादी जाहीर केली. त्यामध्ये चिंचवडमधून राहुल कलाटे यांना तर भोसरीमधून अजित गव्हाणे यांना उमेदवारी जाहीर झाली.
संधी न मिळालेल्यांचे बंड
उमेदवारी डावलल्यानंतर अजित पवार गटातील नाना काटे, भाऊसाहेब भोईर यांनी आणि अजित पवार गटातून शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडे गेलेल्या मोरेश्वर भोंडवे यांनी बंडाचे निशान फडकावले आहे. पिंपरीतून शिवसेनेचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार, सचिन भोसले हेही बंडाच्या पवित्र्यात आहेत. पिंपरीतून सीमा सावळे, भाजपचे राजेश पिल्ले, भोसरीतून शिवसेना ठाकरे गटाचे रवी लांडगे यांनी भूमिका जाहीर केलेली नाही. बंडोबांना थंड करण्याचे आव्हान महायुती-महाविकास आघाडीच्या नेत्यांपुढे असणार आहे.